जिल्हा कचेरीवर शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST2021-02-06T04:30:35+5:302021-02-06T04:30:35+5:30
परभणी : पेट्रोल, डिझेल या इंधनाच्या दरवाढीविरोधात शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी ...

जिल्हा कचेरीवर शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा
परभणी : पेट्रोल, डिझेल या इंधनाच्या दरवाढीविरोधात शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच या दरवाढीचा निषेध करण्यात आला.
शिवसेनेच्या वतीने इंधन दरवाढी विरोधात शुक्रवारी परभणीत आंदोलन करण्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानुसार दुपारी १२च्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात बैलगाडी, सायकल व दुचाकीसह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, काशीनाथ काळबांडे, अनिल सातपुते, हनुमंत पौळ, रवींद्र धर्मे, संजय गाडगे, माणिक पोंढे, सखुबाई लटपटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बैलगाडीत बसून तसेच काही कार्यकर्ते सायकलवर बसून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. काही कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच इंधनदरवाढीचा निषेध करण्यात आला. त्यानंतर या संदर्भात मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना देण्यात आले. निवेदनात कोरोना संकटामुळे अनेकांचे रोजगार बुडाले, रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरवाढ रोखण्यात केंद्र शासन अपयशी : नावंदर
पेट्रोल, डिझेल तसेच गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे कोरोनामुळे संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. असे असताना केंद्र शासन ही दरवाढ रोखण्यात अपयशी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले तरी त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळू दिला जात नाही आणि कच्च्या तेलाचे दर वाढल्यावर मात्र पुन्हा इंधन दरवाढ केली जाते. केंद्राची ही भूमिका निषेधार्ह आहे, असे डॉ. विवेक नावंदर यांनी सांगितले.
महागाईने जनता त्रस्त : कदम
पेट्रोलियम कंपन्यांकडून सातत्याने इंधनदरवाढ केली जात आहे. त्यामुळे महागाई कमालीची वाढली आहे. यावर नियंत्रण आणणे आवश्यक असताना केंद्र शासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या या भूमिकेमुळे सर्वसामान्य माणसात चीड निर्माण झाली आहे. या इंधन दरवाढीचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी यावेळी सांगितले.