लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून, खावी लागू शकते जेलची हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST2021-09-12T04:22:14+5:302021-09-12T04:22:14+5:30
परभणी : सोशल मीडियाचा वापर करताना आपण कोणत्या पोस्टला लाईक, शेअर किंवा फॉरवर्ड करतोय हे तपासून पाहावे आणि मगच ...

लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून, खावी लागू शकते जेलची हवा
परभणी : सोशल मीडियाचा वापर करताना आपण कोणत्या पोस्टला लाईक, शेअर किंवा फॉरवर्ड करतोय हे तपासून पाहावे आणि मगच इतरांना पाठवावी. अनेकदा बदनामीकारक मजकूर न पाहता तसाच चूकून पुढे पाठवल्यामुळे तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.
सध्या सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात अनेकजण वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक तसेच अन्य काही बदनामीकारक मजकूरही टाकतात. सोशल मीडिया हाताळणारे अनेकजण मजकूर न वाचताच त्याला फॉरवर्ड करतात. यामुळे कोणताही मेसेज आला असता तो कशाचा आहे, त्यातून कोणता संदेश दिला जात आहे, याची खात्री करून मगच पुढे पाठवावा. एखाद्याच्या बदनामीचा किंवा भावना दुखावणारा मजकूर तुमच्या हातून फॉरवर्ड झाल्यास तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो.
सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून
मोबाईलमध्ये व्हाॅट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सर्व सोशल मीडियावरील माध्यमांचा वापर प्रत्येकजण करत आहे. या सर्व ॲपचा वापर करताना त्याचे नियम समजून मगच पुढे वापरावे.
अशी घ्या काळजी
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटला जोडलेल्या मित्र-मैत्रिणी व ओळखीच्यापैकी कोणी एखादी पोस्ट टाकली तर ती वाचली नसल्यास व आवडली नसल्यास लाईक करू नये. धार्मिक भावना दुखावणारी तसेच तिरस्कार करणाऱ्या व समाजविघातक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टला फॉरवर्ड करू नये.
मुलींनो डीपी सांभाळा
विविध वयोगटातील मुलींसह महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना आपल्या एकट्याचा डीपी शक्यतो व्हाॅट्सअप स्टेटस किंवा फेसबुकवर ठेवू नये. घरातील सदस्य, भाऊ-बहीण यांच्यासोबतचा फोटो ठेवावा. या एकट्या फोटोचा अनेकदा सोशल मीडियावर गैरवापर करतात.
वर्षभरात आठ गुन्हे
जिल्हाभरात विविध कारणातून सोशल मीडियावर झालेली बदनामी व अन्य कारणांनी दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यातील ७ ते ८ गुन्हे सायबर विभागाकडे सोशल मीडिया प्रकारातील असल्याने तपासासाठी आले होते.
हा मार्ग निवडावा
आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये एखाद्याकडून चुकीची पोस्ट टाकण्यात आली असेल तर अशा व्यक्तीला अनफ्रेंड किंवा अनफॉलो करावे. तसेच बदनामी करणारा मजकूर पुढे पाठवल्यास व त्यात दोषी आढळल्यास ६ महिने ते ३ वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.