साडेसातशे घरात शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST2021-07-25T04:16:41+5:302021-07-25T04:16:41+5:30
११ जुलै रोजी परभणी शहर आणि परिसरात अतिवृष्टी झाली होती. दुपारी २ वाजता सुरू झालेला पाऊस रात्री साडेआठ वाजेपर्यंत ...

साडेसातशे घरात शिरले पाणी
११ जुलै रोजी परभणी शहर आणि परिसरात अतिवृष्टी झाली होती. दुपारी २ वाजता सुरू झालेला पाऊस रात्री साडेआठ वाजेपर्यंत बरसत होता. मागील अनेक वर्षांत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरून नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले. येथील बसस्थानकासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. तसेच वसमत रस्त्यावरही कंबरेएवढे पाणी झाले होते. या दोन्ही भागात दुकाने आणि घरात पाणी शिरले. त्याचप्रमाणे दर्गा रोड, कारेगाव रोड भागातील कॅनॉल परिसर तसेच पिंगळगड नाला परिसरातील वसाहतींमध्ये पाणी शिरूर नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले होते.
या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम तहसील प्रशासनाने पूर्ण केले आहे. शहर परिसरातील सुमारे साडेसातशे घरात पाणी शिरून नुकसान झाल्याचा अहवाल तहसील प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल केला आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे शहरातील घरांच्या झालेल्या नुकसानीची माहिती शासनाला कळविण्यात आली असून शासनाकडून नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा लागली आहे.
नालेसफाईला खो दिल्याने उद्भवली परिस्थिती
महानगरपालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई केली जाते. मात्र, यावर्षी प्रशासनाने नाल्यांची सफाई केली नाही. शहराजवळून वाहणारा डिग्गी आला हा मोठा नाला असून, शहरातील अनेक वसाहतींचे पाणी या नाल्यात मिसळते. अतिवृष्टीच्या दिवशी जागोजागी नालीतून हे पाणी वसाहतींमध्ये शिरले. तसेच पिंगळगड नाल्याला पूर आल्याने या नाल्याचे पाणीही वसाहतीत शिरल्याने नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे.
शहरवासीयांना मदतीची प्रतीक्षा
११ जुलै रोजी अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. शहरातील नुकसानग्रस्त घरांचा सर्व्हे करावा, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार प्रशासनाने सर्वेक्षण पूर्ण केले असून, त्याचा अहवाल प्रशासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना आता मदतीची प्रतीक्षा लागली आहे.