जिल्हास्तरीय पीक स्पर्धेत सेलू तालुका अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST2021-06-28T04:13:51+5:302021-06-28T04:13:51+5:30
संशोधित तंत्रज्ञान स्वीकारून पिकांच्या सुधारित जातींच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची प्रयोगशील वृत्ती वाढीला लागावी. पिकांची उत्पादकता आणि एकूण उत्पादनवाढ, शेतकऱ्यांची आर्थिक ...

जिल्हास्तरीय पीक स्पर्धेत सेलू तालुका अव्वल
संशोधित तंत्रज्ञान स्वीकारून पिकांच्या सुधारित जातींच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची प्रयोगशील वृत्ती वाढीला लागावी. पिकांची उत्पादकता आणि एकूण उत्पादनवाढ, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सतत नवनवीन प्रयोग करणाऱ्या आणि उत्पादन वाढविणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही पीक स्पर्धा तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर घेण्यात आली होती. या पीक स्पर्धेत सर्वसाधारण गटात हरभरा, ज्वारी व गहू या रब्बी पिकांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील वैयक्तिक शेतकरी या पीक स्पर्धेत सहभागी झाले होते. कृषी विभागाच्या वतीने समितीमार्फत अधिकारी, कर्मचारी व सरपंच, पोलीस पाटील यांच्या समितीने या शेतकऱ्यांच्या पिकांचा कापणी प्रयोग घेऊन पिकांचे उत्पादन काढण्यात आले. या उत्पादनाचा अहवाल जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आला. या उत्पादनावर आधारित प्रत्येक पिकासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक नुकतेच घोषित करण्यात आले. बक्षीसपात्र ९ शेतकऱ्यांमध्ये सेलू तालुक्यातील ४, मानवत तालुक्यातील ३, तर परभणी व पालम तालुक्यांतील प्रत्येकी एका शेतकऱ्याचा समावेश आहे. या शेतकऱ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
असे आहे बक्षिसांचे स्वरूप
तालुका पातळीमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्हास्तरावर १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. निवड समितीमध्ये जिल्हा कृषी अधीक्षक संतोष आळसे, डॉ. संदीप जगताप, महादेव लोंढे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे यांचा समावेश होता.
जिल्हास्तरावर निवड झालेले शेतकरी
हरभरा
प्रथम : बाबासाहेब अंबादास कवडे (रा. पिंपळगाव गोसावी, ता. सेलू. उत्पन्न ४६ क्विंटल)
द्वितीय : ज्ञानेश्वर माणिक काकडे (रा. पारवा, ता. परभणी. उत्पन्न ४६ क्विंटल हेक्टरी)
तृतीय : प्रभाकर तुकाराम काळे (रा. पिंपळगाव गोसावी, ता. सेलू उत्पन्न ४५ क्विंटल हेक्टरी)
ज्वारी
प्रथम : विष्णू दगडोबा टेहरे (रा. मानवत उत्पन्न ४९ क्विंटल ७५ किलो हेक्टरी)
द्वितीय : सुरेखा पांडुरंग सोळंके (रा. म्हाळसापूर, ता. सेलू. उत्पन्न ४६ क्विंटल हेक्टरी)
तृतीय : राजेश विनायक शेवाळे (रा. राजवाडी, ता. सेलू. उत्पन्न ४२ क्विंटल)
गहू
प्रथम : बाबाराव उगाजी पाते (रा. कोथाळा, ता. मानवत. उत्पन्न ५८ क्विंटल ७५ किलो)
द्वितीय : लताबाई अंबादास सोनटक्के (रा. सावंगी, ता. पालम. उत्पन्न ५१ क्विंटल हेक्टरी)
तृतीय : अनिता प्रल्हाद काळे (रा. सावळी, ता. मानवत. उत्पन्न ५० क्विंटल हेक्टरी)