तुर्की येथील प्रदर्शनात नागठाणकर यांच्या व्यंगचित्राची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST2021-05-03T04:12:26+5:302021-05-03T04:12:26+5:30
तुर्की देशातील इस्तंबूल शहरात २०२० मध्ये ऑनलाईन पद्धतीने व्यंगचित्र स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जगातील ४५ देशांमधील १२५ ...

तुर्की येथील प्रदर्शनात नागठाणकर यांच्या व्यंगचित्राची निवड
तुर्की देशातील इस्तंबूल शहरात २०२० मध्ये ऑनलाईन पद्धतीने व्यंगचित्र स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जगातील ४५ देशांमधील १२५ व्यंगचित्रकारांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ५३ व्यंगचित्रकारांची निवड प्रदर्शनासाठी झाली आहे. त्यात भारतातील ३ व्यंगचित्रकारांचा समावेश आहे. तुर्की देशातर्फे काढल्या जाणाऱ्या मासिकांमध्ये नागठाणकर यांच्या व्यंगचित्रांचा समावेश होणार असल्याचे आयोजकांनी नागठाणकर यांना कळविले आहे. लहान मुले कोरोनावर मात करतील, या विषयावर सिद्धार्थ नागठाणकर यांनी व्यंगचित्र रेखाटले होते. या व्यंगचित्राची प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
सिद्धार्थ नागठाणकर यांनी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित कला विभागाचे प्रशिक्षक म्हणून काम केले असून त्यांनी यापूर्वी राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत सहभाग नोंदवून पारितोषिके मिळविली आहेत. परभणी येथे त्यांनी चार महिन्यांपूर्वीच कलानंद आर्ट वर्ल्ड या नावाने गॅलरी सुरू केली आहे. त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाच्या महामारीने जगाला चिंतेत टाकले आहे. त्यातून लहान मुलेही सुटली नाहीत. अशा परिस्थितीत लहान मुले कोरोनाला कशा पद्धतीने हरवू शकतात, अशी संकल्पना नागठाणकर यांनी व्यंगचित्रातून मांडली. त्यांच्या व्यंगचित्राला जगातील ४५ देशातील नामांकित ५३ व्यंगचित्रकारांच्या पंगतीत स्थान मिळाले आहे.