दुसऱ्या दिवशीही बाजारपेठेत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:16 IST2021-04-12T04:16:07+5:302021-04-12T04:16:07+5:30
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने व्यवसायांवर निर्बंध घातले असून, वीक एण्डचे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बाजारपेठ पूर्णतः ...

दुसऱ्या दिवशीही बाजारपेठेत शुकशुकाट
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने व्यवसायांवर निर्बंध घातले असून, वीक एण्डचे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यात शनिवारीच संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. रविवारीही व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन केले आहे. शहरातील कच्छी बाजार, गुजरी बाजार, नानलपेठ, स्टेशन रोड हा परिसर बाजारपेठेचा भाग आहे. या भागातील जवळपास सर्वच दुकाने रविवारी बंद ठेवण्यात आली. सुटीचा दिवस असल्याने आणि राज्य शासनाच्या निर्बंधांमुळे परिसरामध्ये शुकशुकाट पाहावयास मिळाला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध लागू केले असले तरी शहरातील रस्त्यांवर मात्र नागरिकांची दिवसभर वर्दळ दिसून आली. शासनाच्या निर्बंधांमुळे मागील काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर अनेक दुकाने बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे बाजारपेठ भागातील उलाढाल ठप्प झाली आहे. व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध आहे. राज्य शासनाकडेही या संदर्भात मागणी करण्यात आली असून, काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.