शोधमोहिमेत आढळले कुष्ठरोगाचे २५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:34 IST2020-12-12T04:34:02+5:302020-12-12T04:34:02+5:30
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ डिसेंबरपासून क्षय व कुष्ठरोगाच्या रुग्णांचे शोध अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील १४ ...

शोधमोहिमेत आढळले कुष्ठरोगाचे २५ रुग्ण
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ डिसेंबरपासून क्षय व कुष्ठरोगाच्या रुग्णांचे शोध अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील १४ लाख ८६ हजार ८८७ नागरिकांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कालिदास निरस तसेच कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. विद्या सरपे यांनी दिली.
८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार १०१ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यातील ८ लाख ३७ हजार ८ नागरिकांची तपासणी झाली. या कालावधीत २ हजार ७४३ संशयित रुग्ण आढळले. या संशयित रुग्णांपैकी १ हजार ३९२ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये २५ रुग्ण कुष्ठरोगाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१०३९ पथकांची स्थापना
क्षय आणि कुष्ठरोग शोधमोहिमेसाठी ग्रामीण भागात ९३७ तर शहरी भागात १०२ अशा १ हजार ३९ पथकांची स्थापना केली आहे. प्रत्येक पथकात एक पुरुष स्वयंसेवक आणि आशा स्वयंसेविका यांचा समावेश आहे. नागरिकांची शारीरिक तपासणी केली जात असून, त्यात लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा तपासणी केली जात आहे. १६ डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबविली जाणार असून, १७ ते ३१ डिसेंबरदरम्यान रुग्णनिदान व विविध तपासण्या केल्या जाणार आहेत.
जिल्ह्यात कुष्ठरोग व क्षयरोग संयुक्त तपासणी मोहीम राबविली जात आहे. या अभियानातंर्गत येणाऱ्या पथकाला आरोग्य समस्या सांगून नागरिकांनी आरोग्याची तपासणी करून घ्यावी. तसेच येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे.
शिवानंद टाकसाळे,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., परभणी