परभणी शहरातील शाळा १० डिसेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:27 IST2020-12-05T04:27:37+5:302020-12-05T04:27:37+5:30

लॉकडाऊननंतर मिशन बिगेन आगेन अंतर्गत राज्यातील सर्व अस्थापना टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार परभणी महानगरपालिका क्षेत्र वगळता सर्व ...

Schools in Parbhani city from 10th December | परभणी शहरातील शाळा १० डिसेंबरपासून

परभणी शहरातील शाळा १० डिसेंबरपासून

लॉकडाऊननंतर मिशन बिगेन आगेन अंतर्गत राज्यातील सर्व अस्थापना टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार परभणी महानगरपालिका क्षेत्र वगळता सर्व जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या दहावी व बारावीचे वर्ग २ डिसेंबरपासून सुरु करण्यात आले आहेत. परभणी शहरातील दहावी व बारावीचे वर्गही सुरु करण्याचा निर्णयही प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यानुसार १० डिसेंबरपासून १९९ शाळांमधील वर्गांना प्रारंभ होणार आहे. संबंधित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यासाठी १०० टक्के उपस्थिती राहणे बंधनकारक असून शाळेतील एखाद्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास ती शाळा ५ दिवस बंद ठेवली जाणार आहे. त्यानंतर निर्जंतुकीकरण करुन शाळा सुरु करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिले आहेत. शाळेमध्ये हॅण्डवॉश मशीन, थर्मलगन, ऑक्सिमीटर उपलब्ध करणे बंधनकारक आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, दिरंगाई किंवा हायगय आढळून आल्यास कारवाई केली जाईल, या संदर्भातील आदेशाद्वारे देण्यात आला आहे.

बसचे रुट निश्चित करण्याची सूचना

तालुक्यातील मानव विकास बससेवेकरिता योग्य ते रुटमॅप नकाशासह सादर करावेत. तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दररोज दुपारी २ वाजेपर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना तालुक्यातील शाळांची संख्या, शिक्षक संख्या, आरटीपीसीआर चाचणी केलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह शिक्षक, कर्मचारी, सुरु शाळांची संख्या, उपस्थित शाळांची संख्या आदी माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Web Title: Schools in Parbhani city from 10th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.