शाळेची घंटा वाजली, मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST2021-09-12T04:22:12+5:302021-09-12T04:22:12+5:30
परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मागील महिनाभरापासून कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये शाळा ...

शाळेची घंटा वाजली, मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?
परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मागील महिनाभरापासून कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, मुलांच्या आरोग्याची जबाबदारी अद्याप प्रशासनाने निश्चित केली नसल्याने पालकांसमोर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील ७०४ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. दि. १७ ऑगस्टपासून जिल्ह्यातील आठवी ते दहावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिली ते सातवी, आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. यातील बहुतांश शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील जवळपास ७५० शाळा सध्या सुरू आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवताना शाळेतील सॅनिटायझेशन व मुलांच्या आरोग्याच्या जबाबदारीबाबत वरिष्ठ पातळीवरून लेखी स्वरूपात आदेश न काढल्याने पालकांसमोर मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे ही जबाबदारी निश्चित करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.
शासन निर्णयाची प्रतीक्षा
शहरी भागातील आठवी ते दहावीच्या अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. यामध्ये खासगी शाळांचा समावेश आहे. मात्र, महापालिका स्तरावरील व अन्य शाळांबाबत शासन स्तरावरून आदेश आले नसल्याने व स्थानिक पातळीवरील स्वराज्य संस्थांनी याबाबतचा निर्णय न घेतल्याने काही शाळा सुरू होणे बाकी आहेत. ग्रामीण भागात सर्व गावांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत.
सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?
ग्रामीण भागातील शाळांमध्ये सॅनिटायझेशन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत सॅनिटायझेशन व लसीकरण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, याबाबतचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थेला द्यावा लागणार आहे, असे समजते.
पालकांसमोर शाळेत पाठविण्याचा प्रश्न
अनेक गावांमध्ये मागील महिन्याभरापासून कोरोनाचे रुग्ण सापडलेले नाहीत. त्यामुळे तेथील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, शहरी भागात काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे पालकांसमोर शहरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवताना प्रश्न निर्माण होत आहे.
जिल्ह्यातील ७५० शाळा सुरू
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या व काही खासगी संस्थेच्या मिळून ७५० शाळा सुरू झाल्या आहेत. यात पहिली ते सातवीचे काही वर्ग तसेच आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. आठवी ते दहावीच्या एकूण १ हजार ८०५ शाळा आहेत, यातील उर्वरित शाळा सुरु होणे बाकी आहेत.
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी
पहिली ३४९७९
दुसरी ३६६०५
तिसरी ३८१६४
चौथी ३७२१९
पाचवी २७३००
सहावी ३६२६३
सातवी ३५६४३
आठवी ३५५६९
नववी ३२३००
दहावी २८४४०