सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चार शाळांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST2021-02-05T06:07:35+5:302021-02-05T06:07:35+5:30
ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यात “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान” राबविण्यात येत आहे. यासाठी १०० आदर्श शाळांची निवड करण्यात ...

सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चार शाळांची निवड
ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यात “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान” राबविण्यात येत आहे. यासाठी १०० आदर्श शाळांची निवड करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सूचेता पाटेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा अभियान परिषदेद्वारे या अभियानासाठी पालम तालुक्यातील सायाळा, पुयनी व नाव्हा येथील तर गंगाखेड तालुक्यातील डोंगरजवळा जिल्हा परिषद शाळेची निवड करण्यात आली. या शाळांना भेटी देऊन, आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शाळांचा भौतिक कायापालट, शाळा समितीचे बळकटीकरण व शाळामध्ये आनंददायी शिक्षण होण्यासाठी हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. पर्यावरणस्नेही वातावरण निर्माण होण्यासाठी ‘एक मूल एक झाड’ ही संकल्पना राबवावी व या कार्यक्रमाला सांगड म्हणून मानव विकास मिशन अंतर्गत संबंधित शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी सायकलचे वाटप करण्याचे निर्देश यावेळी मुगळीकर यांनी दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी संबंधित शाळांना संरक्षण भिंती, विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी परसबाग निर्माण करणे, शौचालयाची दुरुस्ती व शाळेच्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आरओ, कंपोस्ट पिट याबाबत निर्देश दिले. शिक्षणाधिकारी पाटेकर यांनी तालुक्यातील निवड झालेल्या शाळांना भेटी देऊन निकष पूर्ण केल्याची तपासणी करावी आणि तसा अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले. निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना ३ जानेवारी २०२२ रोजी सावित्रीबाई फुले जयंती दिनी आदर्श शाळा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, पालमचे गटशिक्षणाधिकारी ढवळे, गंगाखेडचे विस्तार अधिकारी भालेराव, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा समन्वयक योगेश जाधव, तालुका समन्वयक अमरदीप वाकळे, शिवराज शिंदे, हनुमंत हिंगारूपे आदी उपस्थित होते.