निवडणुकीची लगीनघाई, शस्त्र जमा केले की नाही ? परवानाधारकांना पोलिसांच्या सूचना

By राजन मगरुळकर | Published: March 20, 2024 06:32 PM2024-03-20T18:32:24+5:302024-03-20T18:32:50+5:30

पोलिस प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

Rushing to the election, whether to collect weapons or not? Police Notice to Licensees | निवडणुकीची लगीनघाई, शस्त्र जमा केले की नाही ? परवानाधारकांना पोलिसांच्या सूचना

निवडणुकीची लगीनघाई, शस्त्र जमा केले की नाही ? परवानाधारकांना पोलिसांच्या सूचना

परभणी : राजकारणी असो की मोठे व्यावसायिक याशिवाय विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडून स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना काढला जातो. हे शस्त्र परवाने जिल्हा प्रशासन व पोलिस अधीक्षक यांच्यामार्फत गृह विभागाच्या परवानगीने दिले जातात. सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागल्याने याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून संबंधित परवानाधारक शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. निवडणुकीच्या लगीनघाईत संबंधितांनी आपले शस्त्र संबंधित नजीकच्या पोलिस ठाण्यात जमा करणे गरजेचे आहे. अन्यथा प्रशासनाकडून पुढील कारवाई सुद्धा होऊ शकते.

बदलत्या काळानुसार गरजेप्रमाणे अनेकजण परवाना काढून शस्त्र बाळगण्यास प्राधान्य देतात. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज सादर केल्यानंतर प्रक्रिया राबविली जाते. स्वसंरक्षणासाठी हा शस्त्र परवाना दिला जातो. जिल्ह्यामध्ये एकूण ६८१ शस्त्र परवाने घेतले आहेत. यात लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार सोबतच विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हाप्रमुख याशिवाय मोठे व्यापारी यांच्याकडून सुद्धा हे परवाने काढले जातात. आर्म ॲक्ट १९५९ नुसार भारत सरकारने नागरिकांना शस्त्र परवाना घेण्याची सुविधा अटींसह दिली आहे. मात्र, संबंधिताला कोणत्या कारणासाठी शस्त्र परवाना हवा आहे, याचे कारण त्यामध्ये स्पष्ट करावे लागते. सध्याच्या आधुनिकतेत कमरेला बंदूक असणे हे एकप्रकारे स्टेटस मानले जात असल्याने अनेकजण आवश्यकता नसतानाही बंदुकीचा परवाना मिळावा म्हणून प्रयत्न करतात. मात्र, योग्य ती शहानिशा करून आवश्यकतेनुसारच संबंधितांना शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली जाते.

निवडणूक जाहीर होताच प्रक्रिया
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत संबंधितांनी ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आपण राहतो तेथे सदरील परवानाधारक शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. परभणी शहरातील प्रमुख तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक शस्त्र परवानाधारक आहेत. त्यांच्याकडून त्या-त्या पोलिस ठाण्यामध्ये हे शस्त्र जमा केले जात आहेत. याबाबत पोलिस विभागाकडून संबंधितांशी पत्रव्यवहार, संपर्क साधून शस्त्र जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अनेकांनी हे शस्त्र जमा केले आहेत.

तुम्हीही घेऊ शकता शस्त्र परवाना ?
आर्म ॲक्ट १९५९ नुसार भारत सरकारने नागरिकांना शस्त्र परवाना घेण्याची सुविधा दिली आहे. परंतु, त्यासाठी अनेक अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत. मात्र, संबंधिताला कोणत्या कारणासाठी शस्त्र परवाना पाहिजे, त्याचे कारण स्पष्ट करावे लागते. जिल्ह्यामध्ये ६८१ जणांनी अटी व शर्तीसह गृह विभाग शस्त्र परवाना देण्याची प्रक्रिया पूर्ण करतो.

निवडणूक काळात शस्त्र जमा
विविध ठाण्यात शस्त्र जमा करण्यासाठी संबंधित परवानाधारक येत आहेत. ज्यांनी त्यांचे परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही, अशांनी नूतनीकरण करणे गरजेचे आहे. निवडणूक कालावधी पूर्ण झाल्यावर पुढील निर्देशाप्रमाणे संबंधितांना परवाना नूतनीकरण असल्यास शस्त्र परत केले जाते. परवाना नूतनीकरण ज्यांचा नाही अशांना नूतनीकरण सादर करून लेखी अर्जाद्वारे हे शस्त्र परत दिले जाते

Web Title: Rushing to the election, whether to collect weapons or not? Police Notice to Licensees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.