दोन्ही लाटेत ग्रामीण भाग आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:08+5:302021-06-06T04:14:08+5:30
मागीलवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. सुरुवातीच्या काळात रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी, हळूहळू त्यात मोठी वाढ ...

दोन्ही लाटेत ग्रामीण भाग आघाडीवर
मागीलवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. सुरुवातीच्या काळात रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी, हळूहळू त्यात मोठी वाढ होत गेली. पहिला लाटेमध्ये केवळ ७ हजार ५५१ रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली; मात्र दुसर्या लाटेत जिल्ह्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढली. प्रत्येकदिवशी ४०० ते ५०० रुग्ण नोंद झाले. जिल्ह्यातील हा संसर्ग आता कमी झाला असला, तरी दोन्ही लाटेत नोंद झालेल्या एकूण ५० हजार ७०४ रुग्णांपैकी ग्रामीण भागांमध्ये ३० हजार ३६५ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. शहरी भागाशी तुलना करता, ग्रामीण भागात ५९.८८ टक्के रुग्ण नोंद झाले आहेत. उर्वरित रुग्ण शहरी भागातील आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांची ही आकडेवारी पाहता, येत्या काळात शहरापेक्षा ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा फारशी मजबूत नव्हती. कोरोनाच्या तपासण्याबरोबरच रुग्णांचे रुग्णालयांमध्ये दाखले होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. परिणामी ग्रामीण भागात हा संसर्ग वेगाने वाढत गेला. गावेच्या गावे कोरोना बाधित झाली. जिल्ह्यात ८०४ गावे असून, त्यापैकी ७११ गावांमध्ये कोरोना पोहोचला. ही बाब लक्षात घेता, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.
एप्रिल महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिना जिल्ह्यासाठी डोकेदुखी ठरला. या काळात सर्वाधिक २३ हजार २२ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२० अखेर जिल्ह्यात केवळ ७ हजार ५५१ रुग्णांची नोंद झाली होती. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत तब्बल ४३ हजार १५३ रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यात ३३५, फेब्रुवारी महिन्यात ६४४, मार्चमध्ये ६ हजार ७७३, एप्रिल महिन्यात २३ हजार २२ आणि मे महिन्यामध्ये १२ हजार ३७९ रुग्णांची नोंद झाली आहे.
तोकडी आरोग्य सुविधा
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमधून आरोग्य सेवा दिली जाते; मात्र सध्याची स्थिती लक्षात घेता, ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवा पुरविताना तारेवरची कसरत करावी लागते. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे.