पाथरीजवळ बंदरवाडा आखाड्यावर दरोडा; एकास मारहाण करत लाखोंची लुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 18:49 IST2020-10-17T18:49:32+5:302020-10-17T18:49:58+5:30
घराच्या व्हरांड्यात झोपलेल्या महिलेचे दागिने लुटले

पाथरीजवळ बंदरवाडा आखाड्यावर दरोडा; एकास मारहाण करत लाखोंची लुट
पाथरी : शहरापासूनजवळ असलेल्या बंदरवाडा येथे 5 ते 6 दरोडेखोरांनी पहाटे 4 वाजेच्या सुमारास शेत आखाडयावरील घरात शनिवारी ( दि. 17 ) दरोडा टाकला. दरोडेखोरांनी घरातील एकाला मारहाण करत 1 लाख रुपये किमतीचे दागिने लुटून नेले.
भागवत चतुर्भुज वाघमारे हे बंदरवाडा येथील आखाड्यावर दोन भावांसह राहतात. शुक्रवारी रात्री वाघमारे कुटुंब झोपी गेले. पहाटे 4 वाजेदरम्यान भागवत वाघमारे खोलीतून बाहेर आले. याचवेळी 5 ते 6 दरोडेखोरांनी त्यांच्यावर लाठ्याकाठ्याने हल्ला केला. प्रसंगावधान राखत त्यांनी खोलीचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर दरोडेखोरांनी घराच्या व्हरांड्यात झोपलेल्या पार्वतीबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने घेऊन तेथून पोबारा केला. घटनास्थळी सकाळी श्वानपथक, ठसे तज्ञ यांच्या पथकासह अपर पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी भेट दिली. यावेळी एलसीबी पोनि प्रविण मोरे, प्रभारी पोनि बालाजी तिप्पलवाड व स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली.