रस्त्यांच्या कामांना प्रशासनाकडून फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:17 IST2021-02-10T04:17:11+5:302021-02-10T04:17:11+5:30
स्वच्छतेच्या कामांना मनपाचा खो परभणी : शहरातील अनेक प्रभागांमध्ये अस्वच्छता निर्माण झाली असून, मनपाचे स्वच्छता कर्मचारी नियमित स्वच्छता करण्यासाठी ...

रस्त्यांच्या कामांना प्रशासनाकडून फाटा
स्वच्छतेच्या कामांना मनपाचा खो
परभणी : शहरातील अनेक प्रभागांमध्ये अस्वच्छता निर्माण झाली असून, मनपाचे स्वच्छता कर्मचारी नियमित स्वच्छता करण्यासाठी येत नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तुंबलेल्या नाल्या, रस्त्यांवर धूळ अशी प्रभागातील अवस्था झाली आहे. तेव्हा मनपाच्या स्वच्छता विभागाने स्वच्छतेचे नियोजन करुन नियमित स्वच्छता करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
जिल्हा रुग्णालयात वाहनांचा गराडा
परभणी : येथील जिल्हा रुग्णालयात खाजगी वाहने अस्ताव्यस्त लावले जात असून, त्याचा त्रास रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. रुग्णालय परिसरात वाहनतळाची सुविधा नसल्याने दिसेल त्या मोकळ्या जागेत वाहने उभी केली जातात. रुग्णवाहिका, नातेवाईकांची चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा या भागात गराडा पडला आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना दवाखान्यात दाखल करताना कसरत करावी लागते.
शहरातील चौकांची बकाल अवस्था
परभणी : शहरातील प्रमुख चौकांची बकाल अवस्था झाली आहे. मनपा प्रशासन चौक सुशोभिकरणासाठी पुढाकार घेत नसल्याने जुने चौक मोडकळीस आले आहेत. अपना कॉर्नर, जुना मोंढा, ग्रँड कॉर्नर या भागातील चौकांची अवस्था दयनीय झाली आहे. मनपाने या चौक परिसरात सुशोभिकरण करुन शहर सौंदर्यात भर घालावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
वीज कंपनीचा वसुलीवर भर
परभणी : महावितरण कंपनीला मार्च महिन्याचे वेध लागले असून, वीज बिल वसुलीवर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे मोठी थकबाकी आहे. या थकबाकीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन महावितरणने आता वसुली अभियान सुरू केले असून, घरोघरी जाऊन वीज बिलांची वसुली केली जात आहे.
रेल्वेस्थानकावर पार्कींगचा बोजवारा
परभणी : येथील रेल्वेस्थानक परिसरात आता प्रवाशांची संख्या वाढत आहे. या प्रवाशांना स्थानकावर सोडविण्यासाठी येणारे नातेवाईक नो पार्कींगच्या जागेतच वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे पार्कींग व्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. लॉकडाऊनपूर्वी स्थानकावर पार्कींगच्या कडक नियमांची अंमलबजावणी केली जात होती. मात्र आता आटोरिक्षांसह दुचाकी वाहनेही अस्ताव्यस्त उभी केली जात आहेत.