शहरातील रस्त्यांची कामे निधीअभावी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST2021-03-26T04:17:50+5:302021-03-26T04:17:50+5:30
जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट परभणी : जानेवारी महिन्यापासून जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट होत आहे. मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस ...

शहरातील रस्त्यांची कामे निधीअभावी ठप्प
जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट
परभणी : जानेवारी महिन्यापासून जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट होत आहे. मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने भूजल पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र जानेवारी महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढत असल्याने त्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. भूजल पातळी खोल जात असल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.
ग्रामीण रेल्वे प्रवाशांना आर्थिक झळा
परभणी : रेल्वे प्रशासनाने सवारी रेल्वे गाड्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना शहरात येण्यासाठी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सर्वसाधारणपणे सवारी रेल्वे गाड्यांना १०ते २० रुपये तिकिट असताना याच प्रवासासाठी ७०ते ९० रुपये मोजावे लागत आहेत. यात लघू व्यावसायिकांचे सर्वाधिक नुकसान आहे.
बारा कि.मी.च्या रस्त्यावर अनेक खड्डेश
पिंगळी : परभणी ते पिंगळी या १२ कि.मी. अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. मध्यंतरी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र हे काम संथगतीने सुरू आहे. सध्या हा रस्ता एका बाजूने खोदून ठेवला आहे. त्यामुळे मागील एक महिन्यापासून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, पिंगळीसह परिसरातील पाच ते सात गावांतील ग्रामस्थांसाठी हा दररोजचा वर्दळीचा रस्ता आहे.
रबी हंगामातील पीक काढणी सुरू
पिंगळी : परभणी तालुक्यातील पिंगळी व परिसरात रबी हंगामातील पिकांची काढणी सुरू झाली आहे. मागील आठवड्यात अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी काढणीची लगबग सुरू केली आहे. गहू, ज्वारी आणि हळद या पिकाची सध्या काढणी सुरू आहे. काढणी केलेले पीक सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.
पुलाच्या कामामुळे वाहतूक ठप्प
परभणी : येथील रेल्वेस्थानकाजवळील विद्यापीठ गेट परिसरात रेल्वेचा उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे हा मार्ग मागील दोन महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी मुख्य गेटचा वापर करावा लागत आहे.
वाहतूक सिग्नल दहा वर्षांपासून बंद
परभणी : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उभारण्यात आलेले सिग्नल मागच्या दहा वर्षांपासून बंद आहेत. लाखो रुपयांचा खर्च करुन ही यंत्रणा उभारण्यात आली होती. मात्र केवळ नियोजनाच्या अभावामुळे सिग्नल धूळ खात उभे आहेत. सध्या शहरात वाहनांची संख्या वाढली असून, या वाहतुकीला नियंत्रित करण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.
जायकवाडी कालव्यात गाळ
परभणी : जिल्ह्यातून जाणाऱ्या जायकवाडीच्या डाव्या कालव्यात गाळ साचला आहे. त्यामुळे कालव्याला पाणी सोडल्यानंतर हे पाणी टेलपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे लाभक्षेत्रात येत असतानाही शेतकऱ्यांना जायकवाडीच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. पाटबंधारे विभागाने जायकवाडी कालव्यातील गाळ उपसून घ्यावा, अशी मागणी होत आहे.