कोरोनातील सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजाराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST2021-06-28T04:13:55+5:302021-06-28T04:13:55+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ५० हजार ७९७ रुग्ण आढळले आहेत. साधारणतः अनेक घरांमध्ये मोठ्या व्यक्तींना कोरोना होऊन गेला. यामध्ये काही ...

कोरोनातील सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजाराचा धोका
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ५० हजार ७९७ रुग्ण आढळले आहेत. साधारणतः अनेक घरांमध्ये मोठ्या व्यक्तींना कोरोना होऊन गेला. यामध्ये काही ठिकाणी लहान बालकांनाही कोरोनाची लागण झाली होती. पहिल्या व दुसऱ्या लाटेनंतर कोरोना होऊन गेलेल्या बालकांच्या शरीरात तयार होणाऱ्या अँटिबॉडीज लक्षात घेता, बालकांना एमएसआयसी आजार होण्याची शक्यता असते. यामध्ये ताप येणे, उलटी होणे तसेच जुलाब लागणे अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात. या लक्षणांकडे पालकांनी दुर्लक्ष न करता त्वरित बालकांची बालरोगतज्ज्ञ किंवा जिल्हा रुग्णालयातील बाल विभागात तपासणी करावी, जेणेकरून या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. जिल्हा आरोग्य विभागाने सेरो सर्वेक्षण सुरू केले आहे. काही बालकांचे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार खासगी तसेच सररीका रुग्णालयात मिळून जवळपास शंभर ते दोनशे मुलांना हा धोका मागील दोन महिन्यात झाल्याचे तपासणीतून दिसून आले.
जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण - ५०७९७
कोरोनावर मात केलेले रुग्ण - ४९२३५
उपचार घेत असलेले रुग्ण - २८२
एकूण मृत्यू - १२८०
जिल्ह्यात ५०० बालकांना कोरोना
जिल्ह्यात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मिळून आतापर्यंत जवळपास ५०० बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पहिल्या लाटेत ३ टक्के, तर दुसऱ्या लाटेत हे प्रमाण ५ टक्के एवढे होते. मागील दोन महिन्यात खासगी रुग्णालयात एमएसआयसी आजाराची लक्षणे आढळलेली जवळपास २०० बालके तपासणीसाठी आली होती.
अशी आहेत लक्षणे...
ताप येणे
सर्दी होणे,
जुलाब लागणे
उलटी होणे
डेंग्यू, टायफाॅईडकडे दुर्लक्ष न करणे
ताप न उतरल्यास मेंदूला सूज येणे
कोट
पालकांनी लहान बालकांमध्ये होणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्यांची त्वरित तपासणी करावी. हा आजार नवीन असला तरी पालकांनी घाबरून जाऊ नये. बालरोगतज्ज्ञ किंवा जिल्हा रुग्णालयातील बाल विभागाकडे जाऊन सर्व प्रकारच्या तपासण्या करून घ्याव्यात. सरकारी रुग्णालयात सुध्दा याबाबत सर्व यंत्रणा उपलब्ध आहे.
- डाॅ. संदीप कार्ले, बालरोगतज्ज्ञ.
ही घ्या काळजी...
सर्वप्रथम घरोघरी बालकांना स्वच्छ हात धुणे, बाहेर जाताना नेहमी मास्कचा वापर करणे हे संस्कार पालकांनी करणे गरजेचे आहे.
तसेच बालकांच्या सुरक्षेसाठी घरातील सर्व सदस्यांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. लहान मुलांना यामुळे धोका होणार नाही.
ताप किंवा उलटी, जुलाब अशी लक्षणे वाटल्यास त्वरित बालरोगतज्ज्ञ डाँक्टरांकडे जाऊन तपासण्या कराव्यात. रक्त, २-डी इको या तपासण्या केल्यावर त्यातून निदान होऊ शकते.
गोळ्या - औषधीचा डोस पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.