ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला; दुसऱ्या लाटेत १२६ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:18 IST2021-04-23T04:18:59+5:302021-04-23T04:18:59+5:30
परभणी : कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत असून ग्रामीण भागातील ६२५ गावांमध्ये कोरोना दाखल झाला आहे. या दुसऱ्या ...

ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला; दुसऱ्या लाटेत १२६ मृत्यू
परभणी : कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत असून ग्रामीण भागातील ६२५ गावांमध्ये कोरोना दाखल झाला आहे. या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत १२६ जणांचा मृत्यू झाला आहे.
जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. हा संसर्ग सध्या झपाट्याने वाढत आहे. आता हळूहळू ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत केवळ शहरातच कोरोना रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र रुग्णांची संख्या वाढू लागली तसे जिल्हा प्रशासनाने सेलू, गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालय आणि तालुक्याच्या प्रत्येक आरोग्य केंद्रात कोरोना बाधितांवर उपचार सुरू केले आहेत. गंगाखेड येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. आता कुठे प्रशासनाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सीजन बेडची सुविधा निर्माण करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे सध्यातरी अत्यवस्थ रुग्णांना परभणी शहर गाठावे लागत आहे.
गंगाखेडमध्ये ऑक्सिजन बेड फुलं
गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात २० ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. या सर्व बेडवर सध्या रुग्ण उपचार घेत आहेत. सेलू येथे ८ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. मात्र तज्ञ वैद्यकीय अधिकार्यांचा अभाव असल्याने या ठिकाणी रुग्णांवर उपचार करताना अडचणी निर्माण होत आहेत.
शहरावर वाढला ताण
परभणी शहरात ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता असणारे ग्रामीण भागातील रुग्ण परभणी शहरातच उपचार घेत आहेत.