४५ दिवसांत तक्रारदाराचे २० हजार रुपये परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:13 IST2021-06-11T04:13:05+5:302021-06-11T04:13:05+5:30
परभणी : दक्षिण भारत यात्रेदरम्यान तक्रारदारांकडून घेतलेले २० हजार रुपये ४५ दिवसांत परत करावेत तसेच नुकसान भरपाई म्हणून ५ ...

४५ दिवसांत तक्रारदाराचे २० हजार रुपये परत करा
परभणी : दक्षिण भारत यात्रेदरम्यान तक्रारदारांकडून घेतलेले २० हजार रुपये ४५ दिवसांत परत करावेत तसेच नुकसान भरपाई म्हणून ५ हजार रुपये व अर्जाचा खर्च ४ हजार रुपये तक्रारदारास द्यावा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे.
जालना जिल्ह्यातील परतूर येथील विजय भगवानराव भोपी यांनी यासंदर्भात यात्रा कंपनीचे राम सोनाजी मालेवार यांच्याविरुद्ध ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती. विजय भोपी, त्यांचे नातेवाईक २०१९ मध्ये दक्षिण भारत रामेश्वर यात्रेला गेले होते. या यात्रेसाठी परभणी येथील राम मालेवार यांच्या यात्रा कंपनीशी त्यांनी संपर्क साधला. प्रत्येक व्यक्तीस १० हजार रुपये खर्च लागेल तसेच संपूर्ण यात्रा काळात एक वेळ चहा, नाश्ता व भोजन देण्याचे ठरले. मात्र, राम मालेवार यांनी तिरुपती येथे निवास व्यवस्था करण्यासाठी प्रत्येकाकडून जास्तीची रक्कम घेतली. तसेच प्रत्येक ठिकाणी निवासस्थान व भोजनाचा खर्च प्रवाशांनाच करावा लागला. १६ ते १९ जून या काळात मालेवार यांनी प्रवाशांकडून २० हजार रुपये घेतले, त्याची पावतीही दिली. मात्र, ही रक्कम यात्रेकरूंना परत करण्यास टाळाटाळ केली.
त्यामुळे विजय भोपी यांनी राम मालेवार यांच्याविरुद्ध ग्राहक न्याय मंचात तक्रार दाखल केली. जिल्हा ग्राहक न्याय मंचाच्या अध्यक्षा ए.जी. सातपुते, सदस्य किरण मंडोत, सदस्य शेख इकबाल अहमद यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. मालेवार यांनी २० हजार रुपये परत देण्याच्या अटीवर घेतले होते, हे पावतीवरून सिद्ध होते. तसेच सेवेत त्रुटी केल्याचाही निष्कर्ष ग्राहक मंचाने काढला असून, राम मालेवार यांनी तक्रारदार विजय भोपी यांना ४५ दिवसांच्या आत २० हजार रुपये परत करावेत, तसेच मानसिक व शारीरिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून ५ हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून ४ हजार रुपये द्यावेत, असा आदेश दिला.