हरभरा विक्रीसाठी अडीच हजार शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:17 IST2021-03-06T04:17:05+5:302021-03-06T04:17:05+5:30
परभणी : नाफेडच्यावतीने जिल्ह्यात ७ ठिकाणी हमीभाव दराने हरभरा खरेदी करण्यासाठी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांकडे ५ ...

हरभरा विक्रीसाठी अडीच हजार शेतकऱ्यांची नोंदणी
परभणी : नाफेडच्यावतीने जिल्ह्यात ७ ठिकाणी हमीभाव दराने हरभरा खरेदी करण्यासाठी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांकडे ५ मार्चपर्यंत २ हजार २४८ शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शुक्रवारपासून हरभरा खरेदी करण्यास परभणी येथील केंद्रावर सुरुवात करण्यात आली आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला. मात्र दुसरीकडे या पावसामुळे शेतकऱ्यांकडे असलेल्या जलस्त्रोतांना मुबलक पाणीसाठा निर्माण झाला. या पाण्याचा शेतकऱ्यांनी सिंचनासाठी उपयोग घेत रब्बी हंगामात यावर्षी १८४ टक्के हरभरा पिकाची पेरणी केली. सद्यस्थितीत हा हरभरा बाजारपेठेत विक्रीसाठी येत आहे. मात्र, खाजगी बाजारपेठेत शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार १०० रुपये प्रती क्विंटलपेक्षा कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून नाफेडच्यावतीने परभणी, जिंतूर, सेलू, बोरी, पाथरी, पूर्णा व सोनपेठ या सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
या केंद्रांवर ५ मार्चपर्यत २ हजार २४८ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे. गुरुवारी या नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी परभणी केंद्रावरील २५ शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी एसएमएस पाठविण्यात आले होते. केंद्रावर विक्रीस आलेल्या हरभऱ्याची शुक्रवारी खरेदी करण्यात आली. या खरेदीचे उद्घाटन जिल्हा मार्केटींग अधिकारी बालाजी शेवाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहकार अधिकारी एम. एन. देशमुख, त्र्यंबकराव बुचाले, प्रताप देशमुख, मुंजाजी चोपडे, एम. डी. देशमुख, रामप्रसाद भालेराव, फैजुल्ला पठाण, उद्धवराव शिंदे आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांनी वेळेत शेतमाल विक्रीस आणावा
द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशनच्यावतीने जिल्ह्यातील ७ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या ठिकाणी हरभरा पिकाला प्रतिक्विंटल ५ हजार १०० रुपयांचा भाव देण्यात येत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शासकीय केंद्राकडून एसएमएस प्राप्त झाला आहे. त्या शेतकऱ्यांनी दिलेल्या वेळेत आपला शेत माल विक्रीस आणावा, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी बालाजी शेवाळे यांनी केले आहे.
केंद्रनिहाय नोंदणी केलेे शेतकरी
परभणी ३६६
जिंतूर २८२
सेलू २३७
बोरी ६३९
पाथरी ४६८
पूर्णा १५९
सोनपेठ ९८