दिलासादायक : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:18 IST2021-05-11T04:18:20+5:302021-05-11T04:18:20+5:30

परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून, सोमवारी ३७४ रुग्णांची नोंद झाली आहे, तर आठजणांचा कोरोनाने मृत्यू ...

Reassuring: A big drop in the number of patients in the district | दिलासादायक : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मोठी घट

दिलासादायक : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मोठी घट

परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून, सोमवारी ३७४ रुग्णांची नोंद झाली आहे, तर आठजणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तब्बल दोन महिन्यानंतर रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.

कोरोना संसर्गामुळे मागील दोन महिन्यांपासून नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. दररोज रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने भीतीच्या सावटाखाली नागरिक वावरत होते. मात्र, मागच्या तीन-चार दिवसांपासून हा संसर्ग कमी झाला असल्याचे जाणवत आहे. १० मे रोजी आरोग्य विभागाला १ हजार ६९३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ३७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या १ हजार २७० अहवालांमध्ये २०६ आणि रॅपिड टेस्टच्या ४२३ अहवालांमध्ये १६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

बाधित रुग्णांची संख्या घटली असली, तरी कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. सोमवारी ८ रुग्णांचा मृत्यू झाला. येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये ५, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात १ आणि खासगी रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ४ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३ हजार ३४४ झाली असून, ३६ हजार ६३८ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार ३५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या ५ हजार ६७१ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील जिल्हा रुग्णालयात २१८, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १२९, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २३१, अक्षदा मंगल कार्यालयात १०४, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये ४८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ४ हजार ४५७ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.

१२६५ रुग्णांची मात

सोमवारी दिवसभरात १२६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाने या रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली. मागील आठवडाभरापासून बाधित रुग्णांच्या प्रमाणात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सोमवारी ३७४ बाधित रुग्ण नोंद झाले, तर १२६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title: Reassuring: A big drop in the number of patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.