Ratnakar Gutta arrested after refusing bail in case of taking loan in favor of farmers | शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलल्याच्या प्रकरणात जामीन फेटाळताच रत्नाकर गुट्टेंना अटक
शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलल्याच्या प्रकरणात जामीन फेटाळताच रत्नाकर गुट्टेंना अटक

ठळक मुद्देन्यायालयीन कोठडीत रवानगीसमर्थकांची न्यायालयात गर्दी

गंगाखेड (परभणी ) : शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलल्याच्या प्रकरणात गंगाखेड शुगरचे चेअरमन रत्नाकर गुट्टे आणि लेखापाल दत्तात्रय गायकवाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळताच मंगळवारी दोघांनाही अटक करण्यात आली. या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे़

गंगाखेड शुगरचे चेअरमन रत्नाकर गुट्टे व इतर कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलल्याच्या प्रकरणात ५ जुलै २०१७ रोजी गंगाधर सोळंके यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडून हा तपास औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला होता.

गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने २० फेब्रुवारी रोजी गंगाखेड शुगरचे मुख्य शेतकी अधिकारी नंदकिशोर शर्मा, ऊसपुरवठा अधिकारी तुळशीराम अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चूसिंग पडवाडे यांना अटक केली होती़ त्यानंतर याच गुन्ह्याच्या संबंधात २६ मार्च रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास गंगाखेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात औरंगाबाद येथील अप्पर पोलीस अधीक्षक जी.जी.कांबळे यांनी दोषारोपत्र दाखल केले. यावेळी रत्नाकर गुट्टे व लेखापाल दत्तात्रय गायकवाड यांनाही नोटीस बजावल्याने ते दुपारी ३ च्या सुमारास न्यायालयात हजर झाले होते.

गुन्हा अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या ९६७ पानी दोषारोपपत्राचे न्यायाधीशांसमोर वाचन झाले. यात सुमारे ३४९ कोटी ९६ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचा उल्लेख करण्यात आला. दोषारोपत्र वाचन झाल्यानंतर अ‍ॅड.रावसाहेब वडकिले, अ‍ॅड.अमित कच्छवे यांनी गुट्टे व गायकवाड यांचा जामीन अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे दोघांनाही तातडीने अटक करण्यात आली. नंतर न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर गुट्टे व गायकवाड यांची परभणी येथील जिल्हा रुग्णालयात तपासणी करून त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली़

समर्थकांची न्यायालयात गर्दी
शेतकरी कर्ज प्रकरणात मंगळवारी दोषारोपत्र दाखल केले जाणार असल्याने पोलिसांनी गंगाखेड येथील न्यायालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. रत्नाकर गुट्टे यांच्या समर्थकांनी यावेळी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती.


Web Title: Ratnakar Gutta arrested after refusing bail in case of taking loan in favor of farmers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.