शॉर्टकटसाठी राँगसाइड चुकीचीच, ही वेळबचत जीवघेणी ठरू शकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST2021-06-28T04:13:59+5:302021-06-28T04:13:59+5:30
परभणी शहरातील राष्ट्रीय महामार्गासह मुख्य बाजारपेठेतील काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक कार्यान्वित आहे. शहर वाहतूक शाखा व महापालिकेने जागोजागी दुभाजक ...

शॉर्टकटसाठी राँगसाइड चुकीचीच, ही वेळबचत जीवघेणी ठरू शकते
परभणी शहरातील राष्ट्रीय महामार्गासह मुख्य बाजारपेठेतील काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक कार्यान्वित आहे. शहर वाहतूक शाखा व महापालिकेने जागोजागी दुभाजक तसेच बॅरिकेट उभारले आहेत. मात्र, असे असूनही दुहेरी रस्त्याने जाण्याऐवजी वाहनधारक शॉर्टकटचा वापर करतात. यामुळे स्वतःसह समोरील वाहनधारकाचा जीव धोक्यात येऊ शकतो. मात्र, याकडे दुर्लक्ष करून वाहनधारक बिनधास्तपणे राँगसाइड जाऊन शॉर्टकटचा वापर करीत असल्याचे रविवारी दुपारी शहरातील ३ ठिकाणांच्या पाहणीत दिसून आले.
ही आहे राँगसाइड
१) रेल्वेस्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय
शहरातील रेल्वे स्थानकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्यास एकेरी वाहतुकीला बंदी आहे. मात्र, यामार्गे अनेक दुचाकी, चारचाकी वाहने ये-जा करतात. यामुळे छोटे-मोठे अपघातही घडले आहेत.
अपघातास निमंत्रण
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शहरात येण्यासाठी रेल्वे स्थानकाहून बस स्टॅण्डकडे जावे लागते. मग वळून येता येते. या मार्गावर दुभाजक टाकले आहे. हे ३०० मीटरचे अंतर ओलांडून मग मुख्य मार्गाने येणे अपेक्षित आहे; परंतु असे केले जात नाही.
पोलीस नसल्यावर थेट प्रवेश
पोलीस रेल्वे स्थानकजवळ असले तर या ठिकाणी बस स्टॅन्डकडे वाहनधारक जातात. एरवी, पोलीस नसताना सर्रासपणे एकेरी मार्गाने वाहतूक केली जाते.
२) नानल पेठ
नानल पेठ येथून शिवाजी चौकाकडे एकेरी वाहतुकीस बंदी आहे. तरी येथून शिवाजी चौकाकडे अनेक वाहनधारकांनी वाहने नेल्याचे दिसून आले.
अपघातास निमंत्रण
या रस्त्यावर व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत तसेच बँक, कार्यालये आहेत. हा रस्ता लहान असल्याने या मार्गावर नेहमी किरकोळ अपघात होतात.
पोलीस सहसा नसतातच
शिवाजी चौकात वाहतूक पोलीस असतात. यामुळे नानल पेठ येथे कधी तरी वाहतूक पोलीस थांबतात. यामुळे पोलीस नसल्याने थेट वाहतूक केली जाते.
३) गुजरी बाजार
शिवाजी चौकाकडून गुजरी बाजारकडे जाणारा एकेरी रस्ता खोदकामामुळे सध्या बंद करण्यात आला आहे. एरव्ही शिवाजी चौकातील मार्गाने गुजरी बाजार विहिरीकडे बंदी आहे. मात्र, याच ठिकाणाहून १०० मीटरचा वळसा घालून जाण्याऐवजी वाहनधारक राँगसाइडने जाऊन शाॅर्टकट वापरतात. रविवारीही असे दिसून आले.
अपघातास निमंत्रण
या रस्त्यावर जड वाहने, फळगाडे, रस्त्यावरील उभी केलेली वाहने यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे.
पोलीस असल्यावर
शिवाजी चौकात वाहतूक पोलीस असतात. यामुळे बालाजी मंदिर रस्ता, नानल पेठ आणि इतर मार्गाने येणारी वाहने गुजरी बाजारकडे जाणे टाळतात; पण पोलीस नसताना मात्र, थेट वाहनधारक येथून जातात.
वाहतूक शाखेचे २ पथक कार्यान्वित
शहरात राँगसाइडने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना लगाम लागावा, यासाठी सध्या २ पथके तैनात केली आहेत. ही पथके काळी कमान, रेल्वेस्टेशन, दर्गा रोड तसेच शिवाजी चौक भागात फिरून कारवाई करतात. दोन्ही पथकांकडून सध्या नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
वाहतूक शाखेच्या वतीने राँगसाइड येणाऱ्या वाहनधारकांना दोनशे रुपयांचा दंड आकारला जात आहे. तसेच शहरात २ पथकेही तैनात केली आहेत. होणारे अपघात टाळण्यासाठी वाहनधारकांनी शॉर्टकट वापरू नयेत.
- सचिन इंगेवाड, सहायक पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, परभणी.
वर्षभरात वीस हजार आठशे वाहनांना दंड
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर मागील वर्षभरात शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये २० हजार ७७९ वाहनधारकांकडून ५३ लाख २४ हजार ८५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या वर्षात मागील सहा महिन्यांत १२ लाखांची वसुली वाहतूक शाखेने केली आहे. यामध्ये अतिवेगाने वाहन चालविणारी ४७७ वाहने, मोबाइलवर बोलणे ६१६, ट्रिपल सीट जाणाऱ्या ५३२ वाहनांवर ही कारवाई करण्यात आली.