जात-धर्म विसरून सरकारला ढासळलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारीवर प्रश्न विचारा : कन्हैय्याकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 17:42 IST2020-01-28T17:41:36+5:302020-01-28T17:42:35+5:30
याविरोधात सर्वांनी जात धर्म विसरून एकत्र यावे.

जात-धर्म विसरून सरकारला ढासळलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारीवर प्रश्न विचारा : कन्हैय्याकुमार
पाथरी : अमित शाह आणि नरेंद्र मोदी गुजरात निवडणुकीवेळी हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचे तंत्र वापरायचे, तेच तंत्र ही जोडगोळी देशभर वापरत आहेत. त्यामूळ सर्वांनी आपले डोके ठिकाणावर ठेवत धर्म बाजूला सारून सरकारला जीवनावश्यक समस्या, ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढत चाललेली बेरोजगारी, संपत चाललेल्या सरकारी नोकऱ्या यावर प्रश्न विचारायला हवेत असे आवाहन विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने केले. सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ आयोजित सभेत मंगळवारी कन्हैय्याकुमार बोलत होता.
शहरातील जिल्हा परिषद मैदानावर मंगळवारी (दि. २८ ) दुपारी १२ वाजता आमदार बाबाजनी दुर्राणी यांच्याकडून केंद्र शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुजाहेद खान, राजन क्षीरसागर, राजेश विटेकर, मुंजाजी भाले पाटील, सारंगधर महाराज, अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, नगराध्यक्ष मीना भोरे, प स सभापती कल्पना थोरात , उपनगराध्यक्ष हनान खान दुर्राणी, नगरसेवक हसीब खान , नगरसेवक कलीम अन्सारी , राजीव पामे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाला, अर्थव्यवस्था ढासळत असताना देशातील जनतेला भ्रमित करण्यासाठी केंद्र सरकारने एनआरसी आणि सीएए लागू केला आहे. याविरोधात सर्वांनी जात धर्म विसरून एकत्र यावे. यावेळी आमदार बाबाजनी दुर्राणी यांनी मुस्लिम समुदायाने या कायद्यांविरोधातील आंदोलने गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गावर राहूनच करावीत असे आवाहन केले.