पंधरा दिवसांत मार्गी लावणार कृषी योजना अनुदानाचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:13 IST2021-06-11T04:13:06+5:302021-06-11T04:13:06+5:30
परभणी : विविध कृषी योजनांचे जिल्ह्यातील अनुदान रखडल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित होते. अनुदानाचा हा प्रश्न येत्या १५ दिवसांत मार्गी ...

पंधरा दिवसांत मार्गी लावणार कृषी योजना अनुदानाचा प्रश्न
परभणी : विविध कृषी योजनांचे जिल्ह्यातील अनुदान रखडल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित होते. अनुदानाचा हा प्रश्न येत्या १५ दिवसांत मार्गी लावू, असे आश्वासन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहे, अशी माहिती आ. डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील कृषी अनुदानाच्या प्रश्नावर आ. डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ९ जून रोजी मुंबई येथे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. या वेळी त्यांना रखडलेल्या अनुदानाची माहिती दिली. या शिष्टमंडळात दिनेश बोबडे, रवी पतंगे, प्रभाकर जयस्वाल, बाजार समितीचे संचालक तानाजी भोसले, बाळासाहेब रसाळ आदींचा समावेश होता. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत फळबागेच्या दुसऱ्या हप्त्याचे अनुदान शासनाकडे प्रलंबित आहे. त्यासाठी १ कोटी ४२ लाख रुपये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले. त्याचप्रमाणे ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत १७८ शेततळी पूर्ण होऊनही निधी उपलब्ध नसल्याने लाभार्थी वंचित आहेत. या लाभार्थ्यांना १५ दिवसांत निधी उपलब्ध करून देऊ, महाडीबीटी योजनेअंतर्गत फळबाग या बाबीची अद्याप सोडत झाली नाही, ती त्वरित केली जाईल, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत राज्य शासनाने २०१९ पासून ८० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सद्य:स्थितीत फक्त ५५ टक्के प्रमाणेच अनुदान मिळाले. वाढीव अनुदानाप्रमाणे दुसऱ्या हप्त्याची रक्कम लवकरच उपलब्ध केली जाईल. कृषीच्या संदर्भाने विविध अनुदान योजनेसाठीची रक्कम १५ दिवसांत जमा केली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिल्याचे आ. डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले.