३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST2021-09-15T04:22:45+5:302021-09-15T04:22:45+5:30
जिल्ह्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: कापूस, सोयाबीन या ...

३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे
जिल्ह्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: कापूस, सोयाबीन या पिकांना अधिक फटका बसला आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील अतिवृष्टीच्या फटक्यातून वाचलेल्या शेतकऱ्यांना सप्टेंबरमधील अतिवृष्टीने खिंडीत गाठल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. या अनुषंगाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्हाभरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत. हे पंचनामे वस्तुनिष्ठ पद्धतीने करावेत. यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी साहाय्यक यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करावी. पंचनामे करताना झालेल्या नुकसानीचे नोटकॅमद्वारे फोटो घेऊन पेरणी क्षेत्राशी बाधित झालेल्या पंचनाम्याचे क्षेत्र तपासून घ्यावे. एकूण झालेल्या क्षेत्राची ऐच्छिक पद्धतीने उपविभागीय अधिकाऱ्यांनी ५ टक्के तर तहसीलदारांनी १० टक्के तपासणी करावी. याशिवाय विभागीय आयुक्तांच्या पथकाकडूनही एकूण पंचनामा क्षेत्राच्या १ टक्का तपासणी ऐच्छिक पद्धतीने होणार आहे. पंचनामे करताना बाधित शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जुलैमधील नुकसानीची वेगळी नोंद
जिल्ह्यात काही भागात जुलै महिन्यातही अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये ६६ हजार १२७ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याने राज्य शासनाकडे ४५ कोटी २१ लाख रुपयांच्या मदतीची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचे पंचनामे करताना जुलैमध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राची द्विरुक्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
तीन विभागांचा संयुक्त अहवाल
झालेल्या पंचनाम्याचा महसूल, कृषी व पंचायत विभागातील अधिकाऱ्यांकडून संयुक्त अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. या संदर्भात विलंब होता कामा नये, असे आदेशात नमूद केले आहे.
सव्वा लाखपेक्षा अधिक नुकसानीचा अंदाज
जिल्ह्यात महसूल व कृषी विभागाच्या अंदाजानुसार ६ व ७ सप्टेंबर रोजी सव्वा लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाल्याचे या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्ष नुकसानीचा अहवाल आल्यानंतर खरी आकडेवारी समोर येणार आहे.