नदीपात्रातील सार्वजनिक विहीर गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:17 IST2021-05-10T04:17:04+5:302021-05-10T04:17:04+5:30
परभणी : तालुक्यातील कुंभारी येथे मनेराअंतर्गत दुधना नदीपात्राच्या मधोमध घेतलेली सार्वजनिक विहीर एका वर्षातच गायब झाली असून आता या ...

नदीपात्रातील सार्वजनिक विहीर गायब
परभणी : तालुक्यातील कुंभारी येथे मनेराअंतर्गत दुधना नदीपात्राच्या मधोमध घेतलेली सार्वजनिक विहीर एका वर्षातच गायब झाली असून आता या विहिरीचे अवशेषही शिल्लक नाहीत. त्यामुळे विहिरीवर केलेला सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या अभियंता व ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटावा आणि गावे टँकरमुक्त व्हावेत, या उदात्त हेतूने विभागीय आयुक्त कार्यालयातून सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक पंचायत समितीला गावनिहाय उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे. मात्र, प्रशासकीय उदासीनतेमुळे या योजनेत मोठा सावळागोंधळ झाल्याचे समोर येत आहे. ग्रामपंचायतीची जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी सार्वजनिक विहीर घेऊन गावात पाणीपुरवठा करणे करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली. याच अंतर्गत मागील वर्षी परभणी तालुक्यातील कुंभारी येथे ७ लाख रुपये सार्वजनिक विहीर योजनेसाठी मंजूर झाले. मनरेगातून विहिरीचे बांधकाम करण्याचे निश्चित झाले; परंतु विहीर घेण्यासाठी पंचायत समितीच्या अभियंत्याने चुकीच्या पद्धतीने जागेची निवड केली. गावात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक जमीन उपलब्ध असताना गावालगत असलेल्या दुधना नदीपात्राच्या मध्यभागी गट क्रमांक १०१ मध्ये विहिरीसाठी जागा निश्चित करून याच ठिकाणी विहीर खोदकामाला प्रारंभ केला. विशेष म्हणजे, मजुरांच्या साह्याने हे काम करणे अपेक्षित असताना जेसीबी यंत्राच्या साहाय्याने खोदकाम करण्यात आले. २२ फुटांपर्यंत विहीर खोदली. याच दरम्यान दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आणि पाण्याच्या प्रवाहात आलेल्या गाळाने ही विहीर बुजून गेली. विशेष म्हणजे, सध्या या ठिकाणी केवळ मुरमाचा थर तेवढा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे विहिरीवर आतापर्यंत केलेला १ लाख ५८ हजार १३६ रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
योजनेपासून ग्रामस्थ राहणार वंचित
सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत कुंभारी गावासाठी ७ लाख रुपयांची योजना मंजूर झाली होती. त्यासाठी विहीर खोदकाम करून बिलही उचलण्यात आले. त्यामुळे आता गावाला नवीन विहीर मिळणार नसून, पर्यायाने ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
कामासाठी अधिकाऱ्यांचीच जेसीबी?
रोजगार हमी योजनेंतर्गत घेतलेल्या विहिरीचे काम मजुरांच्या साहाय्याने करणे अपेक्षित असताना येथे मात्र हे विहीर खोदकाम जेसीबी मशीनच्या साहाय्याने करण्यात आले. तसेच कामासाठी वापरलेली जेसीबी एका अधिकाऱ्याची असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे या प्रकरणात अभियंता आणि ग्रामसेवकाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
कुंभारी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे काम माझ्या कार्यकाळात झाले नाही. मी नवीनच पदभार घेतला असून, सोमवारी या संदर्भात चौकशी केली जाईल. अनुप पाटील, गटविकास अधिकारी, पं.स., परभणी