बटाट्याचे दर घसरल्याने उत्पादक आर्थिक कोंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:19 IST2021-02-11T04:19:03+5:302021-02-11T04:19:03+5:30
जिंतूर : यावर्षी बटाटा शेती किफायतशीर करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी जास्तीचा खर्च करून बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले. मात्र, फेब्रुवारी ...

बटाट्याचे दर घसरल्याने उत्पादक आर्थिक कोंडीत
जिंतूर : यावर्षी बटाटा शेती किफायतशीर करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी जास्तीचा खर्च करून बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बटाट्याची आवक वाढल्याने प्रति क्विंटल ६०० ते ११०० रुपये भाव मिळत असल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
मागील हंगामात झालेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नगदी पीक असलेल्या बटाट्याची जिंतूर तालुक्यात ५० हेक्टरवर लागवड केली. हवामानातील सततच्या बदलामुळे जोमात असलेली बटाट्याची पिके रोगास बळी पडली. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागडी औषधी खरेदी करून फवारणी केली व आपली पिके निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यातही आता उत्पादनात घट दिसून येत आहे. त्याचबरोबर जानेवारी महिन्यात बटाट्याला अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत होता. मात्र, फेब्रुवारी महिन्यात हाच दर ६०० ते ११०० रुपये प्रति क्विंटलवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पिके जगविण्यासाठी व काढणीपर्यंत केलेला खर्च या उत्पादनातून निघत नाही. त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
कृषी विभागाकडून मदतीची गरज
खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन अतिवृष्टीच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यातच शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल म्हणून जिंतूर तालुक्यात ५० हेक्टरवर बटाट्याची लागवड केली. बाजारात हे बटाटे विक्रीसाठी आल्यानंतर भाव गडगडले आहेत. त्यामुळे या बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी कृषी विभाग व राज्य शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील चारठाणा, ब्राह्मणगाव, वरुड, अंबरवाडी, मालेगाव, सोनापूर, जोगवाडा, कान्हा, बेलखेडा, अकोली, लिंबाळा, शेवडी या गावांतील शेतकऱ्यांमधून होत आहे.
‘‘३६०० रुपये प्रति क्विंटल दराने बेणे खरेदी केले होते. आता बाजारात विक्रीसाठी बटाटे आणल्यानंतर ५०० ते ८०० प्रति क्विंटल दराने व्यापारी खरेदी करीत आहेत. त्यामुळे औषधी, खत, याचाही खर्च निघत नसून उलट मजुरीचा आर्थिक भार वाढला आहे.
-भानुदास घुगे, अंबरवाडी, शेतकरी