पंतप्रधानांनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:18 IST2021-05-21T04:18:44+5:302021-05-21T04:18:44+5:30
परभणी : ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हापातळीवर प्रशासनाने प्रयत्न करावेत, ग्रामस्थांची जनजागृती करून त्यांना कोरोनापासून दूर ठेवण्याच्या सूचना ...

पंतप्रधानांनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
परभणी : ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हापातळीवर प्रशासनाने प्रयत्न करावेत, ग्रामस्थांची जनजागृती करून त्यांना कोरोनापासून दूर ठेवण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या साहाय्याने निवडक जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये परभणी येथील जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हेदेखील सहभागी झाले होते. साधारणत: अडीच तासांच्या या संवादात नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोनाच्या अनुषंगाने राबविलेल्या वेगवेगळ्या संकल्पना जाणून घेतल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, यासाठी प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करा, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना ग्रामस्थांच्या मनावर बिंबविण्याची सूचना त्यांनी केली. तसेच कोरोनाच्या अनुषंगाने ग्रामीण, शहरी तसेच वयोगटनिहाय आकडेवारी यांचे वर्गीकरण करून संसर्ग कशा पद्धतीने वाढत आहे, याचा अभ्यास करून उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मराठवाड्यातील परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि जालना या चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी होते.
नगर जिल्ह्यातील पोपटराव पवार यांनी राबविलेल्या ‘कोरोनामुक्त गाव’ उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. हाच पॅटर्न परभणी जिल्ह्यात राबवून गावे कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी व्हिडिओ कॉफरन्सनंतर सांगितले.