पेट्रोलचे दर शंभरीच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST2021-02-14T04:16:17+5:302021-02-14T04:16:17+5:30
परभणी : सर्वाधिक महाग पेट्रोल मिळणारे शहर म्हणून देशभरात चर्चेला आलेल्या परभणी शहरात आता पेट्रोलचे दर आता ...

पेट्रोलचे दर शंभरीच्या घरात
परभणी : सर्वाधिक महाग पेट्रोल मिळणारे शहर म्हणून देशभरात चर्चेला आलेल्या परभणी शहरात आता पेट्रोलचे दर आता शंभरीच्या घरात गेले असून महागाईच्या या भडक्याने सर्वसामान्य नागरिकांबरोबरच ऑटोरिक्षा चालकांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.
देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असून चार महिन्यांपासून होत असलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडून गेले आहे. कोरोनाच्या संकटात परभणीतील सर्वच व्यवसाय अडचणीत सापडले. त्यात ऑटोरिक्षा चालकांनाही नुकसान सहन करावे लागले. आता सर्व व्यवसाय सुरु झाले असतनाही इंधन दरवाढीमुळे ऑटोरिक्षाचालक पुन्हा अडचणीत आले आहेत. ऑटोरिक्षांची दरवाढ करुनही नागरिक प्रतिसाद देत नसल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्ह्यात साधारणत: ८ हजार ऑटोरिक्षाचालक असून पेट्रोल- डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका या व्यावसायिकांना बसला आहे.
शनिवारी परभणी शहरात पेट्रोल ९६.४६ रुपये आणि डिझेल ८६.५ रुपये या दराने विक्री झाले. दोन्ही इंधनाच्या दरात मोठी वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक ऑटोरिक्षा चालकांनी तर हा व्यवसाय बदलून इतर व्यवसाय करण्याचा पर्यायही निवडला आहे.
ऑटोरिक्षाचालकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. बाजारपेठेमध्ये सर्वच वस्तुंचे भाव इंधन दरवाढीमुळे गगनाला भिडले आहेत.
निम्यापेक्षा अधिक भाडे इंधनासाठी खर्च
ऑटोरिक्षाचा व्यवसाय करीत असताना दिवसभरातील मिळालेल्या उत्पन्नातून निम्म्यापेक्षा अधिक रक्कम पेट्रोल आणि डिझेलसाठी खर्च करावी लागते. त्यामुळे महिन्याच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.