जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST2021-05-03T04:12:34+5:302021-05-03T04:12:34+5:30
शहरात रविवारी दुपारपर्यंत कडक ऊन होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले, काही वेळ ढगांचा गडगडाट आणि ...

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
शहरात रविवारी दुपारपर्यंत कडक ऊन होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले, काही वेळ ढगांचा गडगडाट आणि त्यानंतर आलेल्या आभाळामुळे काळोख दाटला होता. दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहर व परिसरात पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस जवळपास सर्वच तालुक्यांत झाला. गंगाखेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. विजेच्या कडकडाटासह परिसरात वादळी वारे सुटले होते, तसेच खंडाळी व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, सोनपेठ तालुक्यात व शहरात रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन वादळी वारे वाहू लागले. यानंतर ४.३० वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, तसेच पालम तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात अर्धा तास अवकाळी पाऊस पडला आहे.
मशागतीची कामे बंद
उन्हाळी हंगामात सुरू असलेली मशागतीची कामे शेतकऱ्यांना बंद करावी लागली आहेत. आंब्याची प्रचंड नासाडी झाली, तर भुईमूग, कांदा पिकाची काढणी सुरू असताना पावसाने व्यत्यय आणला. कांदा पीक पावसाने भिजून गेल्याने नुकसान झाले आहे. शेतात सुरू असलेली पाळी, नांगरणी व वेचणीची कामे दुपारी बंद करावी लागली.