Praising Bihar will not work by staying in Maharashtra; Nawab Malik's Tikastra on Fadnavis | महाराष्ट्रात राहून बिहारची स्तुती चालणार नाही; नवाब मलिकांचे फडणवीसांवर टीकास्त्र

महाराष्ट्रात राहून बिहारची स्तुती चालणार नाही; नवाब मलिकांचे फडणवीसांवर टीकास्त्र

ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. अर्धी चट्टी घालून एका गावात एक बोलायचं आणि दुसऱ्या गावात दुसरं बोलयाचं हे आता चालणार नाही.

परभणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारवर सर्वाधिक प्रेम आहे, असे तेथे जावून म्हणायचे आणि येथे मात्र वेगळी भूमिका घ्यायची. महाराष्ट्रात राहून बिहारची स्तुती चालणार नाही. जनतेला आता सर्वकाही कळते आहे. अर्ध्या चड्डीतून फुल्ल पॅन्टमध्ये तुम्ही आला आहात, याची जाणीव राहु द्या, अशी टीका अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुक्रवारी येथे बोलताना केली.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. बिहारमध्ये जावून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारवर सर्वाधिक प्रेम असल्याचे सांगतात अन्‌ महाराष्ट्रात आल्यावर मात्र वेगळेच बोलतात. अर्धी चट्टी घालून एका गावात एक बोलायचं आणि दुसऱ्या गावात दुसरं बोलयाचं हे आता चालणार नाही. ही सवय त्यांनी सोडली पाहिजे. कारण जनतेला आता सर्वकाही कळत आहे. जनता पाहत आहे. अर्ध्या चट्टीतून तुम्ही फुल्ल पॅन्टमध्ये तुम्ही आला आहात, याची जाणीव राहु द्या, अशी सडकून टीका त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. यावेळी पत्रकारांनी एकनाथ खडसे हे तेथूनच तुमच्याकडे आले आहेत ना, असा सवाल केला असता खडसे हे अर्ध्या चट्टीत नव्हते तर चट्टीवाल्यांसोबत होते, असेही ते म्हणाले. 

केंद्र सरकार राज्यावर अन्याय करीत आहे
राज्याच्या हक्काची जीएसटीची ३० हजार कोटींची रक्कम केंद्र देत नाही. एनडीआरएफची रक्कम देत नाही. त्यामुळे राज्य शासन आर्थिकदृष्या अडचणीत आले आहे. असे असले तरी कर्ज काढूच परंतु शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊ असेही मलिक म्हणाले.

Web Title: Praising Bihar will not work by staying in Maharashtra; Nawab Malik's Tikastra on Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.