कोरोनाची संभाव्य दुसरी लाट; आरोग्य प्रशासनाने औषधी, ऑक्सीजन सिलिंडरचा साठा वाढविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 16:40 IST2020-11-21T16:38:01+5:302020-11-21T16:40:01+5:30
आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक ती तयारी जिल्ह्यात करण्यात आली आहे.

कोरोनाची संभाव्य दुसरी लाट; आरोग्य प्रशासनाने औषधी, ऑक्सीजन सिलिंडरचा साठा वाढविला
परभणी : दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली असून त्यानुसार जिल्ह्यात प्रशासनाने तयारी केली आहे. ऑक्सिजन सिलिंडरसह औषधींचा साठाही वाढविला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी इतर देशांमध्ये या आजाराची दुसरी लाट आल्याने राज्यातील आरोग्य विभागानेही कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण तयारी ठेवली आहे.
आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक ती तयारी जिल्ह्यात करण्यात आली आहे. रुग्ण संख्या कमी झाली असली तरी तालुकास्तरावरील सर्व कोविड केअर सेंटर सुरु ठेवले आहेत. त्याचप्रमाणे ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धताही वाढविण्यात आली आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या जिल्ह्यात वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संशयित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करुन कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजना केली जात आहे. ताप सदृश्य आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. ग्रामीण भागातील फिव्हर क्लिनिक सुरु करण्यात आले असून शहरात व ग्रामीण भागात पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यचे नियोजनही करण्यात आले आहे. कोरोना रुग्णालयांमध्ये आवश्यक असणाऱ्या औषधींचा साठाही सज्ज ठेवण्यात आला असून रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.
प्रयोगशाळेची क्षमता वाढविणार
जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या तपासण्या वाढविल्या आहेत. येथील प्रयोगशाळेमध्ये दररोज दीडशे स्वॅब तपासण्याची क्षमता आहे. ती आणखी वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील सर्व सीसीसी सेंटर सुरु ठेवले असून डॉक्टरांचीही उपलब्धता करण्यात आली आहे. कोरोनाचा धोका अजूनही टळला नसल्याने जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नागरिकांनी पालन करणे आवश्यक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी सांगितले.
ऑक्सिजन बेड ठेवले सज्ज
जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड वाढिवले असून पुरेसा औषधीसाठा सज्ज ठेवला आहे. त्याचप्रमाणे रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय साहित्याचीही पुरेशा प्रमाणात खरेदी केली आहे.
जिल्ह्यात ऑक्सिजन सुविधा असलेल्या बेडची संख्या वाढवून हे बेड सज्ज ठेवले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या इमारतीतही ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध केली आहे. आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या रिक्त जागा भरल्या आहेत. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. - दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी