२८ टक्क्यांपर्यंत पोहोचला पॉझिटिव्हिटी रेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:16 IST2021-04-25T04:16:46+5:302021-04-25T04:16:46+5:30
परभणी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, एप्रिल महिन्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट २८.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे रुग्ण ...

२८ टक्क्यांपर्यंत पोहोचला पॉझिटिव्हिटी रेट
परभणी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, एप्रिल महिन्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट २८.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणावर परिणाम झाला असून, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७४ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.
नवीन वर्षाला प्रारंभ झाला आणि त्यासोबतच कोरोनाचेही आगमन झाले. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली. पूर्वी केलेल्या तपासण्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण नोंद होण्याचे प्रमाण केवळ ४ टक्क्यांपर्यंत होते. मात्र, एप्रिल महिन्यात हे प्रमाण २८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तपासणी केलेल्या नागरिकांमध्ये २८ टक्के नागरिक पॉझिटिव्ह आढळत असल्याने हा संसर्ग किती वेगाने वाढत आहे, याचा अंदाज येतो. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ३० हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यात रुग्ण आढळण्याचे प्रमाण ४.३ टक्के एवढे होते. फेब्रुवारी महिन्यात हे प्रमाण १०.६४ टक्क्यांवर पोहोचले असून, एप्रिल महिन्यात तब्बल २८.६२ टक्के झाले आहे. एकूण तपासणी केलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. हा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाचे मात्र धांदल उडत आहे. दुसरीकडे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही घटले आहे. जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते, परंतु एप्रिल महिन्यामध्ये मात्र ७४.४८ टक्के रुग्णच कोरोनामुक्त होत आहेत. एकीकडे रुग्णांचे वाढलेले प्रमाण आणि दुसरीकडे कोरोनामुक्त होण्याची घटलेली टक्केवारी यामुळे जिल्हावासीयांच्या धास्ती वाढल्या आहेत.
२.५१ टक्के मृत्यूचे प्रमाण
कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही एप्रिल महिन्यामध्ये वाढले आहे. एप्रिल महिन्यात एकूण पेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. या महिन्यांमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण २.५१ टक्के आहे, जे राज्यात सर्वाधिक आहे. एप्रिलमध्ये रुग्ण आणि मृत्यू वाढल्याने कोरोनाविषयी नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.