सेलू तालुक्यातील जोडरस्त्यांची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:16 IST2021-02-15T04:16:11+5:302021-02-15T04:16:11+5:30
सेलू : तालुक्यातील मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या जोडरस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याचा दैनंदिन दळणवळणावर परिणाम झाला असून, सेलू ते ...

सेलू तालुक्यातील जोडरस्त्यांची दयनीय अवस्था
सेलू : तालुक्यातील मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या जोडरस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याचा दैनंदिन दळणवळणावर परिणाम झाला असून, सेलू ते शिंदे टाकळी रस्त्यावरील गोहेगाव पाटी ते गोहेगाव या ३ किलोमीटर रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आलेली नाही. हा रस्ता पूर्णत: उखडला आहे. सेलू-आष्टी मार्गावरील लाडनांद्रा पाटी ते लाडनांद्रा या २ किलोमीटर अंतराच्या जोडरस्त्याचीही दयनीय स्थिती झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. हे दोन्ही रस्ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत येतात. या विभागाने अनेक वर्षांपासून या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी ग्रामस्थांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चिकलठाणा पाटी ते जिवाजी जवळा हा जोडरस्ताही उखडला आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा मागणी केल्यानंतर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. परंतु, संबंधित कंत्राटदाराने हे काम सुरू केले नाही. परिणामी ग्रामस्थांची परवड सुरूच आहे.
शिवसेनेची तक्रार
तालुक्यातील जोडरस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत शिवसेनेने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. खराब रस्त्यांमुळे रुग्णांना वेळेवर दवाखान्यात घेऊन जाता येत नाही. प्रवासातही त्यांना मोठ्या वेदना सहन कराव्या लागतात, असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा पंचायत समितीचे गटनेते रणजित गजमल, सुधाकर पवार, माणिक घुंबरे, दत्ता झोल आदींची नावे आहेत.