जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:34 IST2020-12-12T04:34:13+5:302020-12-12T04:34:13+5:30

परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, १५ जानेवारी रोजी यासाठी मतदान होणार आहे. ...

Polling for 566 gram panchayats in the district on January 15 | जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान

परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, १५ जानेवारी रोजी यासाठी मतदान होणार आहे. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जवळपास दोन महिन्यांपूर्वी या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. आता अनलॉक प्रक्रियेनंतर निवडणूक विभागाने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मतदार याद्यांचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होईल, याकडे ग्रामीण भागातील नेते मंडळींचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार तहसीलदार १५ डिसेंबर रोजी या निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र घेता व सादर करता येणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी या नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र परत घेता येणार आहेत. याच दिवशी दुपारी ३ नंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार असून, त्यांना चिन्हांचे वाटपही केले जाणार आहे. त्यानंतर १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान प्रत्यक्ष मतदान होणार आहे. १८ जानेवारी रोजी मत मोजणी होणार असून, २१ जानेवारी रोजी या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

आचारसंहितेचा कामांवर परिणाम

मार्चमध्ये लॉकडाऊननंतर शासनाने सर्व योजनांचा निधी गाेठविला होता. फक्त कोरोना उपाययोजनांसाठी निधीची उपलब्धता करण्यात आली. जूनमध्ये अनलॉक जाहीर केल्यानंतर राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला होता. त्यामुळे विकास योजनांसाठी शासनाकडे निधी नव्हता. गेल्या दोन महिन्यांत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असताना महिनाभरापूर्वी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नवीन विकास कामांना मंजुरी देणे, उद्घाटन करणे आदी प्रक्रिया ठप्प झाली. गेल्या आठवड्यातच पदवीधरची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर सदरील आचारसंहिता संपुष्टात आली होती. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातही आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आणखी महिनाभर विकास कामे ठप्प होणार आहेत.

Web Title: Polling for 566 gram panchayats in the district on January 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.