शहरात पोलिसांची जागोजागी नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:35+5:302021-05-28T04:14:35+5:30
परभणी : संचारबंदी काळात शहरातील रस्त्यांवरून फिरणाऱ्या नागरिकांवर गुरुवारी कारवाई करीत पोलिसांनी दंड वसूल केला. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाची रॅपिड ...

शहरात पोलिसांची जागोजागी नाकाबंदी
परभणी : संचारबंदी काळात शहरातील रस्त्यांवरून फिरणाऱ्या नागरिकांवर गुरुवारी कारवाई करीत पोलिसांनी दंड वसूल केला. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाची रॅपिड तपासणीही करण्यात आली. या मोहिमेमुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तो वाढू नये या उद्देशाने पोलीस प्रशासनाने शहरात कारवाया सुरू केल्या आहेत. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करीत या रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांची रॅपिड तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात आला. विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांवरही पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. शहरातील शिवाजी चौक भागात सकाळपासूनच ही मोहीम राबविण्यात आली होती. जलदगती पथकातील पोलीस कर्मचारी, स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी मिळून वाहनधारकांची तपासणी केली. त्याचप्रमाणे वसमत रस्त्यावर काळीकमान येथेही दिवसभर पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांची तपासणी करीत रॅपिड तपासण्या केल्या. पोलिसांचा या मोहिमेमुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी रस्ता बदलून फिरणे पसंत केले.
जिंतूर रोड भागात २१ हजारांचा दंड वसूल
जिंतूर परिसरातही कोतवाली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी जाम नाका येथे नाकाबंदी करीत नागरिकांकडून २१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. सहायक पोलीस निरीक्षक विशाल बाहत्तरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी जाम नाका परिसरात नाकाबंदी केली. या वेळी विनामास्क फिरणाऱ्या १०७ नागरिकांकडून २१ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे १५० जणांची रॅपिड तपासणी करण्यात आली.
आरटीपीसीआर किट संपले
परभणी शहरात पोलीस प्रशासन कारवाई मोहीम राबवत असताना आरोग्य विभागाकडील आरटीपीसीआर किट संपल्याने दिवसभर रॅपिड टेस्टच्या साह्याने तपासणी करण्यात आली. औरंगाबाद येथूनच या किटचा पुरवठा झाला नसल्याची माहिती मिळाली.