परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नो-पार्किंगमधील वाहनांवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 18:05 IST2018-08-02T18:04:07+5:302018-08-02T18:05:01+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नो पार्किंग झोनमध्ये लावलेली दुचाकी वाहनांवर पोलिसांनी आज कारवाई केली.

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नो-पार्किंगमधील वाहनांवर पोलिसांची कारवाई
परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नो पार्किंग झोनमध्ये लावलेली दुचाकी वाहनांवर पोलिसांनी आज कारवाई केली. यावेळी नो- पार्किंगमधील वाहने टोईंग व्हॅनच्या साह्याने उचलून नेण्यात आली. शहर वाहतूक शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ निश्चित केलेले नाही. त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणारे नागरिक कार्यालयाच्या मुख्य भिंतीलगतच आपली वाहने उभी करतात. या ठिकाणी नो पार्किंगचा एक जुना फलकही लावलेला आहे. मात्र या फलकाकडे कोणीही गांभीर्याने पाहत नव्हते.
आज दुपारी साधारणतः १२.३० च्या सुमारास शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरक्षीक गजेंद्र सरोदे आणि कर्मचारी टोईंग व्हॅनसह येथे दाखल झाले. नो-पार्किंगमध्ये लावलेली वाहने थेट उचलून व्हॅनमध्ये टाकण्यात आली. या सर्व वाहनधारकांना दंड लावण्यात आला. अचानक केलेल्या कारवाईमुळे नो पार्किंग फळक जवळ वाहन उभे केलेल्या कर्मचारी आणि नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.
सूचना न देताच कारवाई
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात वाहनतळाची जागा निश्चित केलेली नाही. किंवा कारवाई करण्यापूर्वी कुठल्याही सूचना दिल्या नाहीत. असे असताना धडक कारवाई केल्याने वाहनधारकांत संताप व्यक्त केला जात होता. आधी वाहनतळाची जागा निश्चित करावी, त्यानंतरच कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे, आठ दिवसापूर्वी अशाच पद्धतीने कारवाई करण्यात आली होती.