पाथरी तालुक्यात प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या ८९ जागा अद्यापही रिक्त
By Admin | Updated: August 3, 2014 00:59 IST2014-08-03T00:24:37+5:302014-08-03T00:59:28+5:30
पाथरी : प्राथमिक पदवीधरांच्या ८९ जागा गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत. माध्यमिक मुख्याध्यापकांची २४ पदे भरण्यात आली नाहीत.

पाथरी तालुक्यात प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या ८९ जागा अद्यापही रिक्त
पाथरी : प्राथमिक पदवीधरांच्या ८९ जागा गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत. माध्यमिक मुख्याध्यापकांची २४ पदे भरण्यात आली नाहीत. तर प्राथमिक शिक्षकांच्याही १० जागा समुपदेशानंतर रिक्त राहणार आहेत. यामुळे या तालुक्यात शिक्षकांच्या रिक्त जागांचा गहन प्रश्न उपस्थित झाला आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासन, राज्य शासन शिक्षणासाठी विविध योजनेवर करोडो रुपयांचा खर्च करीत आहेत. मागील काही वर्षात प्राथमिक शिक्षकांच्या अनेक जागा भरण्यात आल्या. परंतु रिक्त पदांची संख्या मात्र कायमस्वरुपी कमी झालेली नाही. प्राथमिक शिक्षकांबरोबरच माध्यमिक शिक्षकांच्या रिक्त जागेचा प्रश्नही तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून भेडसावत आहे. प्राथमिक शिक्षकांच्या तालुक्यामध्ये ३४ जागा रिक्त आहेत. समुपदेशन पद्धतीने शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया पंचायत समितीस्तरावर सुरू असली तरी ३४ पैकी केवळ २४ जागाच भरल्या जाणार आहेत. तालुक्यातील शेवटच्या टोकावर रिक्त असलेल्या जागेवर शिक्षक जाण्यास तयार नाहीत. शहराच्या ठिकाणी सर्वच शिक्षकांना बदली हवी आहे. यामुळे शेवटच्या टोकाला असणाऱ्या गावातील शिक्षकांच्या जागा मात्र रिक्तच राहणार आहेत.
मा. शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागेची समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षण विभागाला सतावत आहे. पदवीधर शिक्षकांच्या ८९ जागा रिक्त असताना २० मुख्याध्यापकांची पदेही रिक्त आहेत. मधल्या काळामध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पदवीधर शिक्षकांना पदोन्नती दिली. यानंतर मात्र या जागा शेवटपर्यंत भरल्या गेल्या नाहीत. शैक्षणिक वर्ष संपण्याच्यापुर्वी तरी या जागा भराव्यात, अशी अपेक्षा पालक वर्गातून केली जात आहे. (वार्ताहर)
जागा तातडीने भरल्या जाणार-आठवले
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने करण्यात येत आहेत. त्याच बरोबर जिल्हास्तरावरून पदवीधर शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू असून पाथरी तालुक्यात रिक्त असलेल्या सर्वच जागा भरण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आठवले यांनी दिली. पाथरी येथे एका कार्यक्रमास आले असताना या प्रतिनिधीने रिक्त जागेबाबत त्यांच्याशी विचारणा केली.
आवश्यक ठिकाणी जागा भरणार - अर्चना पाटील
तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने ५ आॅगस्ट रोजी केल्या जाणार आहेत. प्रशासन आणि शिक्षकांमध्ये समन्वय न झाल्याने २ आॅगस्ट रोजी ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. तालुक्यातील शेवटच्या गावच्या ठिकाणी व आवश्यक त्या ठिकाणी शिक्षकांच्या बदल्या केल्या जातील, अशी माहिती पं.स.च्या सभापती अर्चना शंतनू पाटील यांनी दिली.