परभणीचा पारा ४३.२ अंशांवर : तापमानाबरोबरच जिल्ह्यात उकाडाही वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:50 IST2018-05-27T00:50:24+5:302018-05-27T00:50:24+5:30
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कडक उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता उन्हाबरोबरच उकाड्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.

परभणीचा पारा ४३.२ अंशांवर : तापमानाबरोबरच जिल्ह्यात उकाडाही वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कडक उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता उन्हाबरोबरच उकाड्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.
यावर्षी जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. मार्च महिन्यापासूनच परभणी जिल्ह्याचा पारा ४० अंशाच्या पुढे सरकला असून तब्बल दोन महिने नागरिकांना कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या. मे महिन्यात देखील उन्हाचा पारा वाढलेलाच असून जिल्ह्यातील नागरिकांना संपूर्ण मे महिना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, त्यात भर पडली ती उकाड्याची. मागील आठवड्यापासून वाढत्या तापमानाबरोबरच वातावरणात उकाडाही वाढला आहे. दिवस आणि रात्रीच्या वेळीही उकाडा जाणवत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता कमी होते आणि उकाड्यात वाढ होत असते. यावर्षी मात्र ऊन तसू भरही कमी झाले नाही. शनिवारी जिल्ह्यात ४३.२ अंश कमाल तापमानाची नोंद झाली असून किमान तापमानही २७.५ अंशापर्यंत पोहचले होते. सकाळपासूनच कडक ऊन पडत असल्याने शनिवारी नागरिकांना प्रचंड उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या. त्यातच उकाड्यामुळे दिवसभर अंगाची लाहीलाही झाली होती. सायंकाळी ८ वाजेपर्यंत वातावरणात कमालीची उष्णता होती. त्यामुळे सूर्य मावळल्यानंतरही नागरिकांची घालमेल सुरुच होती.
पुढील आठवडाही वाढत्या तापमानाचा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने २६ ते ३० मेपर्यंतचा हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. यात ३० मेपर्यंत परभणी जिल्ह्याचे तापमान ४४ ते ४५ अंशापर्यंत राहील, अशी शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे ३० मेपर्यंत तरी जिल्ह्यात पावसाची शक्यता नसून नागरिकांना कडक ऊन आणि उकाडा सहन करावा लागणार आहे. सध्या काही भागात तापमान वाढत असले तरी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.