- विजय पाटील
परभणी : महापालिकेतील अपयशामुळे महायुतीतील नेतेमंडळीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. राज्याच्या राजकारणातील नेतेमंडळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत युतीच्या बोलणीसाठी येत आहे, तर दुसरीकडे आघाडीतील नेत्यांमध्ये फाजील आत्मविश्वास वाढल्याने त्यांच्यात बिनसत असल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये अनेक दिग्गज चेहरे उमेदवारीसाठी ताटकळले आहेत.
परभणी जिल्ह्यात महापालिकेवर सत्तेचे मनसुबे ठेवणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी व शिंदेसेनेला मोठी चपराक बसली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आ. सुरेश वरपूडकर यांना भाजपच्या अपेक्षित जागा आणता आल्या नाहीत. आ. राजेश विटेकरांनाही राष्ट्रवादीचे जुने संख्याबळ राखण्याची अपेक्षा पूर्ण करता आली नाही. शिंदेसेना भोपळा फोडणार नाही, युतीत त्यांचे थोडेबहुत भले होईल, हे आधीपासूनच दिसत होते. आ. रत्नाकर गुट्टे यांनी यशवंत सेनेच्या माध्यमातून एक उमेदवार निवडून आणला. त्यांनीही अपेक्षित जोर न लावल्याने एकाच जागेवर समाधान मानावे लागले. मात्र, आता महायुतीतील घटक पक्ष एकेका जागेचा विचार करताना दिसत आहेत.
शिंदेसेनेचा जिल्ह्यात म्हणावा तेवढा प्रभाव नाही, तरीही भाजपला त्यांच्या मागे धावावे लागत आहे. आ. रत्नाकर गुट्टे आपल्या मतदारसंघात प्रभाव ठेवून आहेत. मात्र, भाजप वेगळी लढली तर त्यांनाही त्याचा फटका बसू शकतो. गंगाखेड, पूर्णा पालिकेच्या निवडणुकीत याचा अनुभव दोन्ही पक्षांनी घेतला. त्यामुळे आ. गुट्टे यांना यावेळी सोबत घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यासाठी तेथे त्यांच्याच अटी व शर्ती मान्य करणे भाजपला अवघड जात आहे.
उद्धवसेना व काँग्रेस महापालिकेतील यशाने गेली हुरळूनआघाडीत यापेक्षा वेगळे चित्र आहे. उद्धवसेना व काँग्रेस महापालिकेतील यशाने हुरळून गेली आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणखीच वाढल्या आहेत. चार-दोन जागांचा विचार न करता काँग्रेसने महापालिकेत खुल्या मनाने उद्धवसेनेला साथ दिली. आता जि.प.त काँग्रेसकडून थोड्या जास्तीच्या अपेक्षा व्यक्त होत असल्यास त्या मान्य कराव्यात, असे काँग्रेसजनांना वाटत आहे. मात्र, काँग्रेसकडून मागच्या वेळी शिवसेनेचा सदस्य असलेल्या सर्कलवरही दावा केला जात असल्याने बिनसत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे या दोन पक्षांतील चर्चेचे घोडे जागा वाटपात अडले. खा. संजय जाधव, आ. राहुल पाटील मात्र अजूनही आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी मात्र वंचित व रासपसोबत बोलणी सुरू केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे. उद्धवसेना व काँग्रेसचे सामंजस्य एकाच निवडणुकीनंतर संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीचे रोज शक्तिप्रदर्शनमहायुती व आघाडीतील घटक पक्ष चर्चेत व्यस्त असताना राष्ट्रवादी (अजित पवार) कडून मात्र काल सोनपेठमध्ये तर आज पाथरीत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यांचे उमेदवारही निश्चित आहेत. काहींची नावेही घोषित झाली. शक्य तेवढ्या जास्त जागा लढण्याचा प्रयत्न असल्याचे आ. राजेश विटेकर यांनी स्पष्ट केले.