परभणी : सोमवारपासून मतदार नोंदणी कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:03 IST2019-07-15T00:02:22+5:302019-07-15T00:03:07+5:30
आगामी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीतील सुधारणांसाठी १५ जुलैपासून संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे़ या अंतर्गत मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव वगळणे आणि सुधारणा करण्याची कामे केली जाणार आहेत़

परभणी : सोमवारपासून मतदार नोंदणी कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आगामी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीतील सुधारणांसाठी १५ जुलैपासून संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे़ या अंतर्गत मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव वगळणे आणि सुधारणा करण्याची कामे केली जाणार आहेत़
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत़ १५ ते ३० जुलै या काळात मतदारांकडून या याद्यांवर दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत़ २०, २१, २७ आणि २८ जुलै रोजी विशेष मोहीम घेतली जाणार असून, या दिवशी बीएलओ आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत़ त्यांच्यामार्फत नवीन नाव नोंदणी, दुबार नाव वगळणे आदी कामे केली जातील़ १९ आॅगस्ट रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे़ १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर हा कार्यक्रम राबविला जाणार असून, १ जानेवारी २०१९ रोजी ज्यांची वयाची १८ वर्ष पूर्ण असतील अशांना मतदार यादीत नाव नोंदविता येईल़ आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता पात्र मतदारांना नाव नोंदणीसाठी ही अखेरची संधी असून जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी केले आहे़ सर्व राजकीय पक्षांनीही मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी नियुक्त करावेत, मतदार याद्या अद्यायवत करण्यासाठी बीएलओंशी समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे़ अती महत्त्वाच्या व्यक्तींची नावे चुकीने वगळली जाऊ नयेत, यासाठी डेटाबेसमध्ये चिन्हांकन केले जाणार आहे़ तसेच दिव्यांग व्यक्तींच्या नावालाही चिन्हांकीत केले जाणार आहे़ जिल्हातील ५० प्रकरणांची पडताळणी जिल्हाधिकारी स्वत: करणार आहेत.