लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील वाडी दमई येथे शनिवारी मध्यरात्री चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन घरांमधील नगदी रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे़तालुक्यातील वाडी दमई येथील नागोराव शंकरराव बोरामने आणि हनुमान दादाराव भुरे हे शेजारी-शेजारी राहतात़ ५ मे रोजी मध्यरात्री २़३० ते ३़३० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी नागोराव शंकरराव बोरामने यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला़ नगदी ४ हजार रुपये, ६० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण, १३ हजार रुपये किंमतीचे झुंबर आदी ऐवज चोरून नेला़ त्यानंतर याच घराच्या शेजारी असलेल्या हनुमान दादाराव भुरे यांच्या घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत दीड तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, कानातले झुंबर आणि नगदी २ हजार रुपये चोरून नेले़ दोन्ही घरातील सुमारे १ लाख १७ हजार रुपयांची चोरी करण्यात आली आहे़ या प्रकरणी नागोराव बोरामने यांच्या फिर्यादीवरून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद, पोलीस नाईक दौंडे तपास करीत आहेत़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सोपान मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली़ तसेच श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते़ चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे़
परभणी : दोन घरे फोडून सव्वा लाखाचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:51 IST