Parbhani: Thousands of employees, including one and a half, enter the polling station | परभणी : साडेसहा हजार कर्मचारी मतदान केंद्रात दाखल

परभणी : साडेसहा हजार कर्मचारी मतदान केंद्रात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवारी १५०६ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जात असून मतदान यंत्रासह जिल्हाभरातील सुमारे साडेसहा हजार कर्मचारी मतदान केंद्रांवर दाखल झाले आहेत. रविवारीच रात्रीच ही केंद्रे मतदानासाठी सज्ज करण्यात आली आहेत.
परभणी, जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड या चार विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होत आहे. चारही मतदान केंद्रांतील ५३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी लागणारी सर्व यंत्रणा प्रशासनाने रविवारीच सज्ज ठेवली आहे. रविवारी दुपारी १२ वाजेपासून प्रत्येक मतदारसंघातील स्ट्राँगरुम येथून कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच मुख्यालयापासून ते मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. प्रत्येक कर्मचाºयाला दिलेल्या मतदान केंद्रानुसार मतदान यंत्राचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मतदान अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रावर दाखल झाले होते. या ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्रीतून मतदान यंत्राची सुसज्जता केली आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी सकाळी ५.४५ वाजता मॉकपोल घेतले जाणार आहे.
सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामध्ये वीज, पिण्याचे पाणी यासह ऊन, पावसापासून बचाव करण्यासाठी मतदान केंद्राच्या परिसरात मंडप टाकण्यात आला आहे. तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था केली आहे. या निवडणुकीत दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी स्वयंसेवक व स्वयंसेवी संघटनांची मदत घेतली जात आहे. एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. दिव्यांग मतदाराच्या वास्तव्यापासून ते मतदान केंद्रापर्यंत वाहनांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
एकंदर जिल्हा प्रशासनाने मतदानाची संपूर्ण तयारी केली आहे. मतदान केंद्राच्या परिसरात १०० मीटरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेशही लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय मतदान यंत्र बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन १० टक्के यंत्र राखीव ठेवले आहेत. सोमवारी जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यावर प्रशासन भर देणार आहे.
परभणी मतदारसंघ: १ हजार ३०० कर्मचाºयांची नियुक्ती
४परभणी विधानसभा मतदारसंघात ३०२ मतदान केंद्र असून मतदान केंद्र अध्यक्ष आणि तीन मतदान अधिकारी अशी १ हजार ३३२ कर्मचाºयांची या केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे.
४जिंतूर मतदासंघात ४०७ मतदान केंद्रे असून ४४६ मतदान केंद्र अध्यक्ष आणि तेवढेच मतदान केंद्र अधिकारी अशा १ हजार ७८४ कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.
४गंगाखेड मतदारसंघात ४०३ मतदान केंद्रे असून ४४७ मतदान केंद्र अध्यक्ष आणि तेवढेच मतदान केंद्र अधिकारी अशी १ हजार ७८८ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
४पाथरी विधानसभा मतदारसंघात ३९४ मतदान केंद्रे असून या केंद्रावर ४३५ मतदान केंद्र अध्यक्ष आणि त्याच प्रमाणात ३ मतदान केंद्र अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. या मतदार संघात १ हजार ७४० अधिकारी- कर्मचारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविणार आहेत.
४याशिवाय चारही मतदारसंघामध्ये ६३ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यात जिंतूरमध्ये २०, परभणीमध्ये २२, गंगाखेड १३ आणि पाथरी मतदारसंघात ८ सूक्ष्म निरीक्षकांचा समावेश आहे. या सर्व अधिकारी- कर्मचाºयांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
४ सखी मतदान केंदे्र
जिल्ह्यात ४ सखी मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये शारदा विद्यामंदिर, जिंतूर, गांधी विद्यालय एकतानगर परभणी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोदावरी तांडा आणि जिल्हा परिषद मुलींची शाळा, पाथरी या मतदान केंद्रांचा समावेश आहे. या सर्व मतदान केंद्रांचा कारभार महिला अधिकारी- कर्मचारी पाहणार आहेत.

Web Title: Parbhani: Thousands of employees, including one and a half, enter the polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.