परभणी:मुख्यालय सोडल्यास निलंबनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:44 IST2019-03-11T23:43:40+5:302019-03-11T23:44:11+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा अधिकारी- कर्मचाऱ्यांनी रजा घेऊ नयेत, तसेच याकाळात मुख्यालय सोडल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे.

परभणी:मुख्यालय सोडल्यास निलंबनाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा अधिकारी- कर्मचाऱ्यांनी रजा घेऊ नयेत, तसेच याकाळात मुख्यालय सोडल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिकेतील विभागप्रमुखांची आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. शहरातील कार्यारंभ दिलेल्या व सुरु असलेल्या कामांची यादी विभागप्रमुखांनी तत्काळ सादर करावी, असेही ते म्हणाले. शहरातील खाजगी शाळा, महापालिकेच्या जागेत आयुक्तांच्या संमतीशिवाय प्रभाग समित्यांनी सभांना परवानगी देऊ नये. शहरातील होर्डिग्ज, बोर्ड, राजकीय पक्षांचे झेंडे काढून घ्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. महापालिकेतील महापौरांसह इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर लावलेले नामफलक उतरवून घेण्याचे पवार यांनी सूचित केले.