परभणी : निवडणूक परवान्यांसाठी एक खिडकी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:20 IST2019-03-17T23:20:22+5:302019-03-17T23:20:43+5:30
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, या काळात काढावयाच्या विविध परवान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे परवाने देण्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा विभाग सुरू करण्यात आला आहे़

परभणी : निवडणूक परवान्यांसाठी एक खिडकी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, या काळात काढावयाच्या विविध परवान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे परवाने देण्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा विभाग सुरू करण्यात आला आहे़
लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांना प्रचारासाठी विविध परवाने घ्यावे लागतात़ हे परवाने प्राप्त करून घेण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या कार्यालयात संपर्क साधावा लागतो़ ही बाब लक्षात घेऊन कमी वेळेत तात्काळ परवाने मिळावेत, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात हा विभाग सुरू करण्यात आला आहे़
जिल्हा कचेरीच्या पहिल्या मजल्यावर हा विभाग सुरू झाला असून, त्यात चौक सभा व सर्व प्रकारच्या जाहीरसभा, सभेच्या ठिकाणी पोस्टर्स, झेंडे लावणे, खाजगी जागेवर जाहिरात फलक लावणे (कटआऊट वगळून), प्रचार वाहनांची परवानगी, प्रचार कार्यालयाची परवानगी, हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरविणे, ध्वनिक्षेपकाची परवानगी, निवडणूक रोड शो, रॅली, केबल जाहिरात परवानगी आदी ९ प्रकारचे परवाने या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत़ उमेदवारांचे अर्ज सकाळी ९ ते दुपारी ३ या काळात स्वीकारले जाणार असून, कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तात्काळ परवाना दिला जाणार आहे़ तसेच ग्रामपंचायत, नगरपरिषदांचे ना हरकत प्रमाणपत्र त्याच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात एक विस्तार अधिकारी आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातील जबाबदार प्रतिनिधी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत उपलब्ध ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत़ त्याचप्रमाणे मनपा आयुक्तांनी नाहरकत प्रमाणपत्रासाठी एक अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील एक खिडकी कक्षात प्रतिनियुक्त करावा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रतिनिधीही या ठिकाणी नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़