परभणी : फवारणीबरोबरच नाल्यांची सफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:11 IST2019-11-10T00:11:25+5:302019-11-10T00:11:59+5:30
महानगरपालिकेने शहरातील विविध भागात फवारणी बरोबरच नाल्यांच्या सफाईची मोहीम हाती घेतली आहे.

परभणी : फवारणीबरोबरच नाल्यांची सफाई
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महानगरपालिकेने शहरातील विविध भागात फवारणी बरोबरच नाल्यांच्या सफाईची मोहीम हाती घेतली आहे.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक भागात बांधकामाचे साहित्य रस्त्यावर असून त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन हे साहित्य उचलण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. लंगोट गल्ली, खंडोबा बाजार आदी भागात रात्रीच्या वेळी धूर फवारणी करण्यात आली. तसेच वसाहतीअंतर्गत नाल्यांमध्ये फवारणी करण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे.
बसस्थानक, रोज हॉटेल, डिग्गी नाला, खानापूर परिसर, धाररोड आदी भागात नाल्यांची सफाई करण्यात आली. शहरामध्ये स्वच्छतेची कामे सुरु केली असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
शहरामध्ये सध्या स्वच्छता अभियान राबविले जात असून या अभियानांतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रभागनिहाय कामांचे नियोजन करुन देण्यात आले आहे. त्यानुसार सकाळपासून शहरातील विविध भागात स्वच्छतेची कामे होत आहेत.