परभणी-सेलूला पावसाचा तडाखा, अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतात शिरले पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 14:21 IST2017-08-29T14:21:15+5:302017-08-29T14:21:58+5:30

परभणीसह जालना जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे दुधना व कसुरा नदीला पूर आला आहे. परभणी व सेलू या तालुक्याला या पुराचा सर्वात जास्त तडाखा बसला आहे.

Parbhani-Selu affects by heavy rain, many villages have lost contact, water entered into the fields | परभणी-सेलूला पावसाचा तडाखा, अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतात शिरले पाणी 

परभणी-सेलूला पावसाचा तडाखा, अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतात शिरले पाणी 

परभणी, दि.29 : परभणीसह जालना जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे दुधना व कसुरा नदीला पूर आला आहे. परभणी व सेलू या तालुक्याला या पुराचा सर्वात जास्त तडाखा बसला आहे. सोमवारी रात्री या पुराचे पाणी परभणी तालुक्यातील कुंभारी, कार्ला, डिग्रस या तीन गावांतील हजारो हेक्टर शेतात घुसले आहे. यासोबतच सेलू तालुक्यातील कसुरा व दुधना नदीला पुर आल्याने पाथरी, वालूर, शिंदेटाकळी, आष्टी या गावाकडे जाणारी वाहतूक पहाटेपासून बंद करण्यात आली आहे.

तीन दिवसांपासून दररोज पाऊस झाल्याने परभणी तालुक्यातून वाहणा-या दुधना नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. 28 ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्यासह जालना जिल्ह्यात पाऊस झाल्याने मोठ्या वेगाने नदीत पाणी दाखल झाले. नदीपात्रात पाणी वाढत चालल्याने पात्र सोडून हे पाणी परिसरातील शेत शिवारात घुसू लागले आहे. कुंभारी, कार्ला आणि डिग्रस या तीन गावांतील नदीकाठच्या शेत जमिनीत पुराचे पाणी घुसले असून, पिके वाहून गेले आहेत. हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे अनेक शेतक-यांची जमीन खरडून गेली आहे.मंगळवारी दुपारपर्यंत नदी पात्रातील पाण्याची वाढच होत असल्याने ग्रामस्थांत चिंता व्यक्त केली जात आहे.

सेलू शहरासह परिसरात सोमवारी (ता.२८)  मध्यराञीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे कसुरा नदीला पुर आला आहे.  यामुळे सेलू - पाथरी रस्त्यावरील वाहतूक पहाटेपासून बंद पडली आहे. यासोबतच दूधना नदीवरील राजवाडी पुलावरून पाणी वाहत असल्याने सेलू-वालूर हा रस्तासुद्धा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सेलू मधून शिंदेटाकळी, सातोना मार्गे आष्टी, सोन्ना मार्गे वालूर हि रस्ते सुद्धा पाण्याखाली आल्याने यावरील सर्व वाहतूक बंद झाली आहे. तालुकातून दैनदिन कामासाठी बाहेर गावी जाणा-यांना याचा फार मोठा फटका बसला आहे. 

Web Title: Parbhani-Selu affects by heavy rain, many villages have lost contact, water entered into the fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.