परभणी:जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय सलाईनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:04 IST2019-03-07T00:04:10+5:302019-03-07T00:04:29+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक मागील एक महिन्यापासून फिरकले नाहीत. त्याचप्रमाणे औषधींचा तुटवडा, ठिकठिकाणी असणारी अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व विस्कटलेली प्रशासन व्यवस्था या ग्रामीण रुग्णालयातील सेवाच सलाईनवर असल्याची भावना रुग्णांमध्ये निर्माण होत आहे.

परभणी:जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय सलाईनवर
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक मागील एक महिन्यापासून फिरकले नाहीत. त्याचप्रमाणे औषधींचा तुटवडा, ठिकठिकाणी असणारी अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व विस्कटलेली प्रशासन व्यवस्था या ग्रामीण रुग्णालयातील सेवाच सलाईनवर असल्याची भावना रुग्णांमध्ये निर्माण होत आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयात सहा महिन्यांपूर्वी मुंंंबई येथून वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. दोंडे यांची नियुक्ती झाली. सुुरुवातीला दोन-चार दिवस राहिल्यानंतर महिन्यातील चार दिवस जिंतूरला राहून उर्वरित दिवसाचा कारभार मुंबई येथून बघायचा, हे नित्याचेच झाले आहे. वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालयात नसल्याने इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही. ग्रामीण भागातील सर्वाधिक रुग्ण या रुग्णालयात येतात; परंतु, त्यांना योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांना खाजगी दवाखान्याचा सहारा घ्यावा लागतो.
विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे. त्याच बरोबर औषधींचा तुटवडा जानवत असून बॅडेंंज पट्टीपासून ते दररोज रुग्णांना लागणारी कोणतीच औषधी रुग्णालयात नाहीत. अनेक डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यास भाग पाडतात. दररोज येणाऱ्या रुग्णांची तपासणी व्हिजीट डॉक्टरांकडून करून घेण्यात येते. तज्ज्ञ डॉक्टर ओपीडी काढत नसल्याने नियमित रुग्णांची तपासणी करण्यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आदी डॉक्टरांचा सहारा घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे दवाखान्यामध्ये रुग्णाला पिण्यासाठी पाणी सुद्धा नाही. रुग्णांचे हाल प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. रुग्णांच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. तीनच स्वच्छता कर्मचारी असल्याने रुग्णालयात दुर्गंधी पसरली आहे. ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे, शौचालयातील स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे.
या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या शिवाय रुग्णालयातील अनेक विभागात डॉक्टरांची गरज असते. तात्पुरत्या सेवा देणारे डॉक्टर खाजगी सेवा देण्यास जास्त महत्त्व देत असल्याने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या रुग्णालयातील मोडकळीस आलेला कारभार सुधारावा, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकातून होत आहे.
रुग्णालय रामभरोसे
४जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मुंबईत असल्याने रुग्णालयातील कर्मचारी, सफाई कामगार व इतर रुग्ण सेवक यांच्यावर नियंत्रण राहिले नाही. कोणताही कर्मचारी केव्हाही निघून जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयास प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रकाश डाके व आपण स्वत: भेट देऊन रुग्णालयातील कारभारात तातडीने सुधारणा करण्याबाबत सूचना ्रकेल्या आहेत. तात्पुरत्या स्वरुपात रविकांत चांडगे यांना कारभार पाहण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
-रिझवान काझी,
निवासी शल्य चिकित्सक, परभणी