परभणी : विस्कटलेला संसार पुन्हा जुळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:23 IST2017-11-27T00:22:53+5:302017-11-27T00:23:02+5:30
परभणी : विवाहितेच्या छळाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर कुटूंब कल्याण समितीने यात यशस्वी तडजोड घडवून आणली आहे़ विशेष म्हणजे, समितीपुढे ठेवलेले हे पहिलेच प्रकरण होते़

परभणी : विस्कटलेला संसार पुन्हा जुळविला
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विवाहितेच्या छळाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर कुटूंब कल्याण समितीने यात यशस्वी तडजोड घडवून आणली आहे़ विशेष म्हणजे, समितीपुढे ठेवलेले हे पहिलेच प्रकरण होते़
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांतर्गत जिल्ह्यात कुटूंब कल्याण समितीची स्थापना झाली आहे़ येथील नानलपेठ पोलीस ठाण्यात एका विवाहितेने सासरच्या मंडळींविरूद्ध तक्रार दिली होती़ त्यावरून कलम ४९८ अ भादंवि नुसार गुन्हाही नोंद झाला होता़ ही फिर्याद जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कुटूंब कल्याण समितीकडे वर्ग करण्यात आली़
जिल्हा विधी प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा दिवाणी न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांच्या उपस्थितीत समितीचे सदस्य तथा सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश अब्दुल हफीज अब्दुल सत्तार, हिना रविंद्र सादरानी, रश्मी अजय लांजेवार, संतोष नरहरी गिराम आदींनी या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांसमवेत चर्चा केली़ दोन बैठका घेतल्या़
दोन्ही बैठकांमध्ये समुपदेशन करण्यात आले़ त्यानंतर तडजोड घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला़ तेव्हा दोन्ही पक्षकारांनी एकत्र राहण्याचे लेखी लिहून दिले़ तसेच कोर्टात दाखल केलेली प्रकरणे मागे घेण्याचीही तयारी दर्शविली़ कुटूंब कल्याण समितीच्या प्रयत्नांमुळे विस्कटलेला संसार पुन्हा जुळला आहे़