परभणी: बाभळगावचे प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:43 AM2019-07-13T00:43:29+5:302019-07-13T00:44:36+5:30

ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य महत्त्वाचा दुवा समजला जातो; परंतु, तालुक्यातील बाभळगाव आरोग्य केंद्रात रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ११ जुलै रोजी आरोग्य विभाग स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांमध्ये झालेल्या बैठकीत तक्रारींचा पाढाच वाचला. त्यामुळे ग्रामस्थांच्या संतप्त भावना पाहून बाभळगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र आजारीच पडल्याचे दिसून येत आहे.

Parbhani: The primary health center of Babalgaon is sick | परभणी: बाभळगावचे प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी

परभणी: बाभळगावचे प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य महत्त्वाचा दुवा समजला जातो; परंतु, तालुक्यातील बाभळगाव आरोग्य केंद्रात रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ११ जुलै रोजी आरोग्य विभाग स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांमध्ये झालेल्या बैठकीत तक्रारींचा पाढाच वाचला. त्यामुळे ग्रामस्थांच्या संतप्त भावना पाहून बाभळगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र आजारीच पडल्याचे दिसून येत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या काळात ग्रामीण भागात आजारी पडण्यांचे प्रमाण अधिक असते. सर्वसामान्य रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रावरच अवलंबून असतात. मात्र बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोयी-सुविधा मिळत नाहीत, त्याच बरोबर अनेक पदे रिक्त आहेत. या सर्व अडचणींचा सामना रुग्णांना करावा लागत आहे.
पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत २२ गावे येतात. त्याच बरोबर बाभळगावचीही लोकसंख्या ५ हजारांच्या घरात आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर येणाऱ्या रुग्णांचा भार हलकावा व्हावा, यासाठी ७ उपकेंद्र दिमतीला आहेत. मात्र या प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर विपरित परिणाम होत आहे.
त्यामुळे संतप्त होऊन बाभळगाव येथील ग्रामस्थांनी १० जुलै रोजी आरोग्य सेवा मिळत नसल्याने हे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करावे, अशी भूमिका घेतली. त्यानंतर ११ जुलै रोजी स्थानिक पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्रामध्ये साधे खोकल्याचे औषधही मिळत नाही, डॉक्टर रात्री-अपरात्री थांबत नाहीत, सौर उर्जेची दिवे बंद आहेत, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलबध नाही, अशा तक्रारींचा पाढा ग्रामस्थांनी आयोजित बैठकीत वाचला.
या बैठकीस जि.प. सदस्य कुंडलिक सोगे, प्रल्हाद गिराम, आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे, उद्धव गिराम, रामभाऊ गिराम, कुंडलिक हरकळ, रणजित कांबळे, रामप्रसाद गिराम, आगा खान, शेख निसार, राधाकिशन गिराम आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
एकाच शिपायावर कारभार
४बाभळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात २६ पदे मंजूर आहेत. त्यातील ९ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजेच त्यातही लॅब टेकिनशियन हे महत्त्वाचे पदही भरण्यात आले नाही. औषध निरीक्षक यांचे १, आरोग्य सेविकांची ३ पदे रिक्त आहेत. गाडी वाहनचालक पदही रिक्त आहे. विशेष म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ शिपायांची पदे मंजूर आहेत. त्यातील ३ पदे रिक्त असल्याने एकाच शिपायावर या आरोग्य केंद्राचा डोल्हारा चालतो.
इमारती बनल्या धोकादायक
४पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत मोडकळीस आल्याने धोकादायक बनली आहे. आरोग्य विभागाने ही इमारत जमीनदोस्त करण्याठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र अद्यापही हा प्रश्न प्रलंबितच आहे.
४मोडकळीस आलेल्या इमारतीत वास्तव्य करीत असलेल्या कर्मचारी निवासस्थानाचे विजेचे बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे की, काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाºयांच्या रिक्त जागा आहेत. त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. बैठक घेऊन तात्पुरते नियोजन लावण्यात आले आहे. मात्र रिक्त जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार आहे.
- कुंडलिक सोगे,
जि.प. सदस्य,

Web Title: Parbhani: The primary health center of Babalgaon is sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.